शेतकऱ्यांच्या किडनी विक्रीबाबत जाब विचारला, वडेट्टीवार यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्ज फेडण्यासाठी 19 शेतकऱयांना पंबोडियात जाऊन किडनी विकावी लागली, असा मुद्दा विधानसभेत मांडत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला जाब विचारला होता. त्यावरून आज विधानसभेत भाजप आमदार योगेश सागर यांनी आक्षेप नोंदवला. वडेट्टीवार यांनी दिलेली माहिती दिशाभूल करणारी होती, असे सांगून योगेश सागर यांनी वडेट्टीवार यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान वडेट्टीवार यांनी 19 शेतकऱयांनी कर्ज फेडण्यासाठी आपल्या किडन्या विकल्याचे सभागृहात सांगून दिशाभूल केली. ज्या डॉक्टरांनी किडनी ऑपरेशन केले ते ‘पद्मश्री’ विजेते आहेत, असेही वडेट्टीवार म्हणाले होते. अशाप्रकारे चुकीची माहिती पसरवणे हा खऱया पद्मश्री विजेत्यांचा आणि या सर्वोच्च नागरी सन्मानाचा अपमान असल्याचे सांगत सागर यांनी वडेट्टीवार यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला.