मध्य प्रदेशमधील 29 लोकसभा मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला. मात्र या निवडणुकीमध्ये साम, दाम, दंड आणि भेद या नितीचा वापर सत्ताधाऱ्यांकडून झाल्याचे समोर आले आहे. निवडणुकीनंतर भाजपच्या एकच नेता अनेकदा मतदान करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता तर भाजपचे पदाधिकारी आम्ही 15-15 वेळा मतदान करत असल्याचे अभिमानाने सांगत आहेत. विशेष म्हणजे खासदारासमोर पदाधिकारी या फुशारक्या मारत असून हा सर्व खळबळजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सिरोंजमधील लटेरी येथे भाजप खासदार लता वानखेडे एका नियोजित कार्यक्रमासाठी पोहोचल्या होत्या. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. यावेळी भाजप आमदार उमकांत शर्मा यांचे समर्थक आणि लटेरी नगर परिषदेच्या अध्यक्षांचे पती संजय अत्तु भंडारी हे लोकसभा निवडणुकीवेळी केलेल्या झोलचे कथन करतात.
संजय भंडारी असा दावा करतात की, त्यांनी 13 मतदान केंद्रावर काँग्रेसच्या एकाही पोलिंग एजंटला बसू दिले नाही. तर दुसरीकडे भाजप नगरविकेचे पती महेश साहू हे आपण 15 वेळा मतदान केल्याचा दावा करतात. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस अॅक्शन मोडवर आली असून हे निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेचे उल्लंघन असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
भाजप नेत्यांनीच स्वत: बोगस मतदान केल्याची कबुली दिली आहे. याविरोधात काँग्रेस निवडणूक आयोग आणि न्यायलयात दाद मागणार आहे. यासह पोलिसांमध्येही तक्रार दाखल करणार असल्याचे काँग्रेस प्रवक्त्यांनी म्हटले.
BJP ने लोकतंत्र को लूटतंत्र में बदला, क़ुबूल की लोकसभा चुनाव में मतों की लूट‼️
बीजेपी कार्यकर्ता एक वीडियो में ख़ुद सागर से बीजेपी सांसद लता वानखेड़े को कह रहा है कि
“उसने बूथ में किसी दूसरी पार्टी के एजेंट नहीं घुसने दिये, 15-15 Vote डाले, जीत के लिए उन्होंने सब कुछ किया”… pic.twitter.com/hQgmYZ5agc
— AAP (@AamAadmiParty) August 31, 2024
विदिशाचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहित सूर्यवंशी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, सागर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार लता वानखेडे लटेरी येथे आल्या होत्या. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी आपण कसे बनावट मतदान केले आणि बुथ कॅप्चर केले याच्या फुशारक्या सर्वांसमक्ष मारल्या. यामुळे भाजपचे चारित्र्य आणि खरा चेहरा सर्वांसमोर आला आहे. याविरोधात आम्ही निवडणूक आयोगात धाव घेणार असून निवडणूक रद्द करण्याची मागणी करणार आहोत.