२४ तासाच्या आत दोनदा स्वर्गात… चितेवर उठून बसलेल्याचा काही तासात मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । भोपाळ

एखाद्या चित्रपटात अंत्यसंस्कार आणि त्यानंतरच्या घटना या बऱ्याचदा रंगून दाखवल्या जातात. मात्र जर तुम्हाला कोणी एखादा मृतदेह अंत्यसंस्काराआधी सरणावरच जिवंत झाल्याचं सांगितलं तर तुमचा विश्वासच बसणार नाही. पण हो, हे खरं आहे. भोपाळमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजेश उर्फ टिल्लू कोल असं ४५ वर्षीय व्यक्तीचं नाव असून त्यांचा शनिवारी मृत्यू झाला होता. त्यानंतर अंत्यविधीसाठी त्यांना सरणावर ठेवण्यात आलं तेव्हा अचानक ते जिवंत झाले. मात्र त्यांना मिळालेलं हे जीवनदान अवघ्या काही तासाचं होतं.

राजेश यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने शनिवारी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं. दारुचे अतिरिक्त सेवन झाल्यामुळे त्यांना हा त्रास होत असल्याचं रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांनी त्यानुसार उपचार करायला सुरुवात केली. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

डॉक्टरांनी राजेश यांचा मृत्यू झाल्याचं सांगितल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी अंत्यविधीची सर्व तयारी सुरु केली. त्यानूसार त्यांचा मृतदेह हा सरणावर ठेवण्यात आला. मात्र राजेश यांचा मुलगा त्यांना अग्नी देणार तितक्यात अचानक ते जिवंत झाले. राजेश यांना खोकला आला आणि हे चित्र पाहून साऱ्यांनाच धक्का बसला. राजेश यांना सरणावरून खाली ठेवण्यात आलं. तसेच पुन्हा जिवंत झालेले राजेश अर्धा ग्लास पाणी देखील प्यायले. त्यानंतर उपचारासाठी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. तिथे राजेश यांचा ECG काढण्यात आला. मात्र त्यानंतर ३० मिनिटांनी डॉक्टरांनी पुन्हा एकदा राजेश यांना मृत घोषित केले.