
राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये बीडमधल्या तरुणांनी लक्षणीय यश प्राप्त केले आहे. बीड जिल्ह्यातील चार विद्यार्थी पोलीस उपअधीक्षक झाले आहेत. एक विद्यार्थिनी ही तहसीलदार झाली आहे तर एक तरुण उपमुख्य कार्यकारी अधिकारी झाला आहे. आष्टी तालुक्यातील कडा येथील रवींद्र भोसले यांनी सामाजिक व आर्थिक मागास प्रवर्गातून राज्यात पहिले स्थान पटकावून बीडचे नाव कमावले आहे. महत्वाचे हे की,पात्र उमेदवारांमध्ये ते पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये असून त्यांनी नववे स्थान मिळवले आहे. याशिवाय अंबाजोगाईतील अंबिका सोसायटीतील राहिवासी योगेश राजीव सारणीकर यांची राज्य उत्पादन शुल्कच्या पोलीस उपअधीक्षकदी निवड झाली आहे.
आष्टी तालुक्यातील कडा साखर कारखान्यातील कामगार दिनकर भोसले यांचे पुत्र रवींद्र भोसले यांची पोलीस उपअधीक्षक पदावर निवड झाली. रवींद्र यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण कडा येथील मोतीलाल कोठारी विद्यालयात झाले होते. दहावीला प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर लातूर येथे बारावीपर्यंत शिक्षण घेतले.दोनवेळा अपयश पदरात पडल्यानंतरही खचून न जाता तिसर्या प्रयत्नात त्यांनी यश मिळवले. त्यांची शुक्रवारी उपअधीक्षक म्हणून निवड झाली आहे.
धारुर तालुक्यातील खोडस येथील मूळ रहिवासी अजय विलास कोकाटे हे राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन उपअधीक्षक झाले आहेत. त्यांचा राज्यात तृतीय क्रमांक आला आहे. त्यांचे वडील विलास कोकाटे हे अंबाजोगाई न्यायालयात लिपिक आहेत. याशिवाय अंबाजोगाई येथील योगेश रांजणकर यांचीही उपअधीक्षकपदी निवड झाली असून त्यांच्या वडिल किराणा व्यापारी आहेत. अंबाजोगाईतील राहिवासी योगेश राजीव सारणीकर यांची राज्य उत्पादन शुल्कच्या पोलीस उपअधीक्षकदी निवड झाली आहे.
शिरुर तालुक्यातल्या डॉ. प्रियंका मिसाळ या खुल्या प्रवर्गातील टॉप टेनमध्ये सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांचे नववीपर्यंतचे शिक्षण चंपावती विद्यालय, दहावी भगवान विद्यालय, तर उच्च माध्यमिक शिक्षण अहमदनगर जिल्ह्यात झाले. नंतर त्यांनी नागपूरमध्ये बीडीएसचे शिक्षण पूर्ण केले. पहिल्या प्रयत्नात मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली होती. जलसंपदा विभागात त्या कार्यरत होत्या. आता दुसर्या प्रयत्नात तहसीलदार म्हणून त्यांची निवड झाली आहे. त्यांचे वडील भास्कर मिसाळ हे मुख्याध्यापक आहेत.
शिरूर तालुक्यातल्याच पाडळी येथील अभिजित पाखरे यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड झाली आहे. अभिजित पाखरे यांचे प्राथमिक शिक्षण पाडळी येथील शाळेत झाले असून त्यांनी पदवीचे शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात घेतले आहे. वडील गहिनीनाथ पाखरे हे खालापुरी येथील संस्थेवर शिक्षक असून आई मनीषा पाखरे या जि.प. शाळेत शिक्षिका आहेत. या दोघांच्या निवडीने तालुक्याची मान उंचावली आहे.
























































