एमपीएससीच्या विद्यार्थ्याला हायकोर्टाकडून जामीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आत्महत्येच्या आरोपाखाली गेल्या पाच महिन्यांपासून तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. कारागृहात आणखी काळ राहिल्यास शैक्षणिक नुकसान होईल असे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांनी अर्जदाराचा जामीन अर्ज मंजूर केला.

पीडित मुलीचे फोटो अर्जदाराने तिच्याच इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दुसऱ्या आरोपीला पाठवले होते. या फोटोमुळे तसेच आरोपींनी दिलेल्या मानसिक त्रासामुळे पीडितेने गळफास लावून आत्महत्या केली याप्रकरणी अर्जदारावर पोक्सो, भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने जामिनासाठी अ‍ॅड. विवेक आरोटे, अ‍ॅड. अक्षय डिंगळे यांच्यामार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. आरोपी हा विद्यार्थी असून त्याच्यावर पूर्वी कोणताही गुन्हा नोंदवलेला नाही. तो पाच महिन्यांपासून तुरुंगात आहे. अधिक काळ तुरुंगात राहिल्यास त्याचे शैक्षणिक नुकसान होईल, असे निरीक्षण नोंदवत 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने आरोपीचा जामीन मंजूर केला.