
एसटी महामंडळाने गणेशोत्सवाला कोकणात जाणऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी जादा बसगाडय़ा सोडल्या आहेत. या बसगाडय़ांच्या ग्रुप बुकिंगमध्ये 30 टक्क्यांची भाडेवाढ महामंडळाने बुधवारी जाहीर केली. त्या भाडेवाढीला तीव्र विरोध होताच ती रद्द करण्याची नामुष्की परिवहनमंत्र्यांवर ओढवली. भाडेवाढीचे परिपत्रक रद्द केल्याचे महामंडळाने गुरुवारी जाहीर केले.
पुढील महिन्यात गणेशोत्सव असल्याने कोकणात जाणाऱ्या एसटी बसगाड्यांच्या बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच दरम्यान ग्रुप बुकिंगद्वारे एकेरी पद्धतीने एसटी बस आरक्षित करणाऱ्या प्रवाशांकडून मूळ भाड्यापेक्षा 30 टक्क्यांनी अधिक भाडे आकारणी करण्याचे निर्देश एसटी महामंडळाने दिले होते. ही भाडेवाढ लागू करताना एसटीच्या आर्थिक नुकसानीचे कारण महामंडळाने पुढे केले होते. गणेशभक्तांसह इतर प्रवाशांनी भाडेवाढीवर तीव्र संताप व्यक्त करताच परिवहनमंत्र्यांना 30 टक्के भाडेवाढीचे परिपत्रक रद्द करावे लागले. ग्रुप बुकिंग करणाऱया प्रवाशांना आधीच्या दरानेच भाडेआकारणी करण्याचे निर्देश राज्यभरातील सर्व विभाग नियंत्रकांना देण्यात आले.
होळी आणि आषाढीलाही होणार होती भाडेवाढ
ही भाडेवाढ गणेशोत्सवाबरोबर होळी आणि आषाढी यात्रेच्या काळात लागू करण्याचा सरकारचा इरादा होता. मात्र तीव्र विरोधामुळे चाकरमान्यांच्या खिशावर डल्ला मारण्याचा महायुती सरकारचा डाव पुरता फसला आहे.



























































