पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या संघाने पाकिस्तानला धुळ चारली होती. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडला 152 धावांनी पराभूत करत सामना जिंकला आहे. विशेष म्हणजे या सामन्यात पाकिस्तानच्या दोनच गोलंदाजांनी इंग्लंडच्या संपूर्ण संघाला दोन्ही डावांमध्ये तंबूचा रस्ता दाखवला. 52 वर्षांनंतर असा पराक्रम कसोटी क्रिकेटच्या इतिहासात घडला आहे.
मुल्तानमध्ये पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून माजी कर्णधार बाबर आझम आणि वेगवान गोलंदाज शाहीन शाह अफरीदी यांना वगळण्यात आले होते. असे असले तरीही पाकिस्तानने इंग्लंडचा पराभव केला आहे. पाकिस्तानचा कर्णधार शाम मसून याचा कर्णधार म्हणून पहिला कसोटी विजय ठरला आहे. या सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंनी चांगला खेळ केला त्यामुळेच 152 धावांनी त्यांनी दुसरी कसोटी जिंकली. त्यामुळे तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानने 1-1 अशी बरोबरी केली आहे.
पाकिस्तानच्या नोमान अली आणि साजिद खान यांनी आपल्या तिखट माऱ्याने इंग्लंडचा संघा तंबुत धाडला. दोघांनी मिळून 20 गडी टिपले. पहिल्या डावात गोलंदाजी करताना साजिद खानने 7 आणि नोमान अलीने 3 विकेट घेतल्या होत्या. तसेच दुसऱ्या डावातही दोघांच्या गोलंदाजीची धार कायम होती. दुसऱ्या डावात नोमान अलीने 8 आणि साजिद खानने 2 विकेट घेत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे दुसऱ्या डावात नोमान अली आणि साजिद खान यांच्याव्यतिरिक्त इतर कोणालाही कर्णधार शाम मसूनने गोलंदाजी दिली नाही.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात नोमान अली आणि साजिद खान यांनी केलेला कारनामा सहाव्यांदा मात्र, 52 वर्षांनी घडला आहे. यापूर्वी पहिल्यांदा 1902, 1909, 1910, 1956 आणि 1972 साली एकाच संघाच्या दोन गोलंदाजांनी विरोधी संघाचे सर्व फलंदाज बाद केले होते.