बोला मुंबईकरांनो, एसी लोकलला किती डबे हवे! मध्य रेल्वेचा ‘केबीसी स्टाइल’ सवाल

एसी लोकल प्रवाशांअभावी रिकाम्या धावत असतात. त्यामुळे या लोकलच्या उत्पन्नापेक्षा तिचा मेंटेनन्स सांभाळणे रेल्वेला आता जड जात आहे. त्यामुळे या लोकलविषयी मध्य रेल्वेने प्रवाशांची मते जाणून घेण्यासाठी एक ऑनलाइन सर्वेक्षण सुरू केले आहे. या ऑनलाइन सर्वेक्षणात प्रवाशांना एसी लोकल डब्यांसोबत किती साधे डबे जोडण्यात यावेत असाही ‘केबीसी स्टाइल’ प्रश्न विचारण्यात आला आहे. या लोकलचे भाडे परवडत नसतानाही किती टक्के भाडेवाढ चालेल असाही आश्चर्यकारक प्रश्न विचारला आहे!

चार वर्षांपूर्वी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कारकीर्दीत 25 डिसेंबर 2017 रोजी पश्चिम रेल्वेच्या विरार ते चर्चगेट मार्गावर देशातील पहिलीच वातानुकूलित लोकल ट्रेन सुरू झाली. या पहिल्या लोकल ट्रेनला अनंत तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. तिचे भाडे फर्स्ट क्लासच्या 1.3 पट जादा असल्याने आणि मर्यादित फेऱ्या असल्याने प्रवाशांनी पाठ फिरवली.

एसी लोकल ट्रेन साध्या लोकलच्या फेऱ्या वाया घालवत असल्याने तिला पाहूनच प्रवासी नाक मुरडू लागले. त्यामुळे एसी लोकल ही वेळापत्रकात अतिरिक्त फेरी म्हणून चालविली जावी अशी मागणी झाली. तिच्या विरोधात आंदोलनेदेखील झाली. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. पश्चिम रेल्वेवर चार ते पाच एसी लोकल दाखल झाल्या आहेत. मध्य रेल्वेवरदेखील प्रथम ट्रान्स हार्बर मार्गावर तर नंतर सीएसएमटी ते कल्याणदरम्यान एसी लोकल दाखल करण्यात आली. ही एसी लोकल अर्धे डबे एसी आणि अर्धे नॉन एसी अशा मिश्र स्वरूपात  चालविता येईल का? याविषयी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वे बोर्डाकडे विचारणा केली. याविषयी रेल्वे बोर्ड चाचपणी करीत आहे. त्यामुळे एसी लोकलविषयी प्रवाशांची मते जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पुन्हा एसी लोकल बंद ठेवण्यात आली आहे.

हाच तो केबीसी सवाल!

अ)        3 एसी + 9 नॉन एसी

ब)         6 एसी + 9 नॉन एसी

क)        6 एसी + 6 नॉन एसी

ड)         की सर्वच डबे एसी हवे

ज्येष्ठ नागरिक आणि स्त्रियांना प्रवेश द्या

मध्य रेल्वेने एसी लोकलच्या उपयुक्ततेविषयी फेसबुकसारख्या समाजमाध्यमावर गुगल फॉर्मवर ऑनलाइन सर्वेक्षण सुरू केले आहे. यात तुम्ही रोज लोकलने प्रवास करता का? तुम्ही एसी लोकलने प्रवास करता का? त्याचे नेमके कारण काय? एसी लोकलला साध्या लोकलचे नेमके किती डबे जोडण्यात यावेत? एसी लोकलचे भाडे नेमके किती टक्के असावे अशी प्रश्नांची मालिका सोडविण्यासाठी दिली आहे. परंतु प्रत्यक्षात एसी लोकलचे भाडे कमी पिंवा निदान फर्स्ट क्लासच्या बरोबरीचे तरी असावे अशी प्रवासी संघटनांची मागणी आहे. ही एसी लोकल प्रसिद्ध करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि स्त्रियांना त्यातून फर्स्ट क्लासच्या पासावर प्रवास करू द्यावा अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या