मुंबईची हवा आरोग्याला हानीकारक, प्रदूषण नियंत्रणं मंडळाची धक्कादायक आकडेवारी

मुंबईतील हवेच्या प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई व नवी मुंबईतील महानगरपालिकेला फटकारले होते. त्याननंतर, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) च्या आकडेवारीतून गंभीर स्थिती समोर आली आहे. 2026 या वर्षात आतापर्यंत मुंबईत आरोग्याला हानीकारक हवेचे (AQI) सर्वाधिक दिवस नोंदवले गेले असून, हे प्रमाण नवी मुंबई, ठाणे, वसई-विरार आणि मीरा-भाईंदरपेक्षा जास्त आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वर्गीकरणानुसार 0 ते 50 AQI ‘चांगला’, 51 ते 100 ‘समाधानकारक’, 101 ते 200 ‘मध्यम’, 201 ते 300 ‘खराब’, 301 ते 400 ‘अतिशय खराब’ तर 400 पेक्षा अधिक AQI ‘गंभीर’ मानला जातो.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, 1 जानेवारी ते 24 जानेवारी 2026 या कालावधीत मुंबईत तब्बल 18 दिवस आरोग्याला हानीकारक AQI नोंदवण्यात आला. या काळात AQI पातळी 120 ते 150 दरम्यान राहिली, जी ‘मध्यम’ गटात मोडते आणि विशेषतः लहान मुले, वृद्ध नागरिक व आजारी व्यक्तींसाठी आरोग्याला हानीकारक ठरते. याच 24 दिवसांत मुंबईत केवळ 6 दिवसच समाधानकारक AQI नोंदवण्यात आला.

तुलनेत, नवी मुंबईत 15 दिवस आरोग्याला हानीकारक तर 9 दिवस समाधानकारक AQI नोंदवण्यात आला. वसई-विरारमध्ये 13 दिवस आरोग्याला हानीकारक आणि 10 दिवस समाधानकारक AQI आढळला. ठाण्यात 12 दिवस आरोग्याला हानीकारक आणि 12 दिवस समाधानकारक AQI नोंदवण्यात आला, तर मीरा-भाईंदरमध्ये 13 दिवस आरोग्याला हानीकारक आणि 9 दिवस समाधानकारक AQI आढळून आला.

दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मुंबईतील प्रदूषणाचा भार प्रामुख्याने मानवनिर्मित कारणांमुळे वाढत आहे. वाहनांची मोठी संख्या, वाहनांतून होणारं उत्सर्जन, रस्त्यांवरील धूळ तसेच खासगी व सार्वजनिक प्रकल्पांची मोठ्या प्रमाणात सुरू असलेली विकासाची कामे ही प्रमुख कारणे असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. मुंबईत सध्या 28 AQI मापन केंद्रे कार्यरत आहेत. ठाण्यात कसारवडवली आणि उपवन फोर्ट येथे केवळ 2 केंद्रे आहेत. नवी मुंबईत नेरुळ, महापे, सानपाडा, वाशी, कळंबोली आणि तळोजा येथे 6 केंद्रे आहेत. विरार आणि मीरा-भाईंदर येथे प्रत्येकी फक्त 1 मापन केंद्र आहे.

MPCB अधिकाऱ्यांच्या मते, मुंबईत AQI चे निरीक्षण अधिक व्यापक आणि काटेकोर असल्यामुळे आरोग्याला हानीकारक हवेचे दिवस अधिक स्पष्टपणे समोर येत आहेत. इतर भागांत मापन केंद्रांची संख्या अपुरी असल्याने प्रत्यक्षातील स्थिती पूर्णपणे प्रतिबिंबित होत नाही. दरम्यान, AQI मापन केंद्रांची संख्या वाढवण्याची प्रक्रिया सुरू असून ठाणे, वसई-विरार आणि कल्याण-डोंबिवली या प्रत्येक जिल्ह्यात 3 नवीन केंद्रे उभारण्यात येणार आहेत. तसेच मीरा-भाईंदर, उल्हासनगर आणि भिवंडी-निजामपूर येथे प्रत्येकी 2 केंद्रे बसवली जाणार आहेत. प्रत्येक केंद्रासाठी सुमारे 9 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुढील महिन्यापासून ही केंद्रे टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केली जाणार असून, हिवाळ्यापूर्वी अधिक भागांतील आरोग्याला हानीकारक हवा ओळखून त्यावर उपाययोजना करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. ही योजना महाराष्ट्रभर 50 हून अधिक AQI मापन केंद्रे उभारण्याच्या व्यापक प्रकल्पाचा भाग असल्याचंही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

हवामान बदलामुळे वाढलेलं संकट

सामान्यतः अरबी समुद्र जवळ असल्यामुळे मुंबईसारख्या किनारी शहरांत सातत्याने आरोग्याला हानीकारक AQI नोंदवला जाणं दुर्मीळ मानलं जात होतं. मात्र, हवामान तज्ज्ञांच्या मते, जागतिक हवामान बदलामुळे वाऱ्यांची नैसर्गिक उलटफेर प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे थार वाळवंटातून येणारी धूळ, मध्य पूर्वेकडून येणारी दमट हवा तसेच मुंबईभोवती असलेल्या ठाणे, कल्याण-डोंबिवलीसारख्या उपग्रह शहरांतील आर्थिक हालचाली व वाहन उत्सर्जन यांचा एकत्रित परिणाम मुंबईच्या हवेला अधिकाधिक आरोग्याला हानीकारक बनवत आहे.