मुंबईत रस्त्यांची 239 कामे पूर्ण, 338 कामे अंतिम टप्प्यात

फोटो - प्रातिनिधीक

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या रोखण्यासाठी पालिका युद्धपातळीवर काम करत असताना पावसाळापूर्व कामही वेगात करत आहे. यामध्ये रस्त्यांच्या एकूण 609 कामांपैकी 139 कामे पूर्ण झाली असून 338 कामे अंतिम टप्प्यात आहे. अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांनी ही माहिती दिली. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आल्याने रस्ते,नालेसफाई, पुलांचे बांधकाम, दुरुस्ती, पर्जन्य जलवाहिन्या, मलजलवाहिन्यांची दुरुस्ती नूतनीकरणाचे काम पालिकेच्या माध्यमातून वेगाने सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स पाळून ही कामे केली जात आहे. शिवाय जास्तीत जास्त कामे यांत्रिकी पद्धतीने करण्यावरही भर देण्यात येत असल्याचे वेलरासू यांनी सांगितले.

मुंबईतील कोरोनाचे होटस्पोट असलेल्या 58 ठिकाणची कामे मात्र सध्या खोळंबली आहेत. तर 74 कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार आहेत. 338 कामे अंतिम टप्प्यात असून पावसाळा सुरू होण्याआधी स्टेजमध्ये आणून ठेवली जाणार असल्यामुळे मुंबईकरांना कोणतीही गैरसोय होणार नसल्याची माहितीही प्रशासनाने दिली आहे. दरम्यान कोरोनाचा प्रभाव असला तरी पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी स्थायी समितीच्या मंजुरीनंतर पावसाळापूर्व कामे प्राधान्याने करण्यात येत आहेत. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी देखील पालिका अधिकाऱ्यांसह रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. पावसाळ्याआधी सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले आहेत.

हँकॉक ब्रिजचे कामही वेगात
माजगाव सँडहर्स्ट रोड दरम्यानच्या ऐतिहासिक आणि 2016 मध्ये पाडण्यात आलेल्या हँकॉक ब्रिजचे काम आहे सध्या वेगात सुरू आहे सध्या लोकल बंद असल्यामुळे हे काम वेगाने करता येत आहे. दरम्यान मुंबई शहरात 12 पूर्व उपनगरात 11 आणि पश्चिम उपनगरातील 9 पूल अशा एकूण 32 ब्रिजचे काम प्रगतिपथावर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमी कामगारांच्या उपस्थितीत ही कामे सुरू आहेत. सध्या 560 कामगार, इंजिनियर्स आणि आवश्यक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने हे काम सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या