गांजा सापडल्याच्या घटनेनंतर गेल्या महिनाभरापासून शेकडोंच्या संख्येने मोबाईलही सापडत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अगोदरच सुरक्षेचे प्रश्नचिन्ह निर्माण झालेल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांच्या गुन्हेगारीने आता डोके वर काढले आहे. आज सकाळी साडेसातच्या सुमारास अंघोळीसाठी हौदावर आलेल्या मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता (वय 70) या कैद्याचा ड्रेनेजवरील लोखंडी झाकणाने मारहाण करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली. मनोजकुमार हा मुंबईत 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी होता.
मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील मनोजकुमार गुप्ता हा कैदी कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. त्याच्या खुनाचे कारण समजले नसले तरी सुपारी घेऊनच या कारागृहात शिक्षा भोगणाऱया एका कैद्यांच्या टोळक्याने हा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
दरम्यान, न्यायालयीन बंदी आरोपी प्रतीक उर्फ पिल्या सुरेश पाटील, दीपक नेताजी खोत, संदीप शंकर चव्हाण, ऋतुराज विनायक इनामदार, सौरभ विकास सिद्ध या पाचजणांनी हा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. या पाचजणांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांमधील दोघेजण मोक्कातील आरोपी असल्याची माहिती मिळाली आहे.
कळंबा जेलच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
n कारागृहात गांजा सापडण्यासह कारागृहातील पोलीस कैद्यांना गांजा पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. पाठोपाठ कारागृहात मोबाईलही सापडू लागले आहेत. गेल्या दीड-दोन महिन्यांत कळंबा जेलच्या झडतीत शंभरच्या घरात मोबाईल सापडले. कारागृहातील अंडासेलमध्येही मोबाईल आढळला होता, शिवाय कैद्यांमध्ये हाणामारीच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे तुरुंग अधीक्षकांची तडकाफडकी बदली करीत येथे श्यामकांत शेडगे यांच्याकडे अधीक्षकपदाचा कार्यभार देण्यात आला होता. त्यानंतर शेडगे यांनी पाठविलेल्या अहवालानुसार दोन वरिष्ठ अधिकारी आणि 9 कर्मचाऱयांनी कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट झाले. याची गंभीर दखल घेत कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी एप्रिल महिन्यात दोन अधिकाऱयांसह 9 कर्मचाऱयांना सेवेतून बडतर्फ केले आहे; तसेच दोन वरिष्ठ अधिकाऱयांच्या तडकाफडकी बदल्या केल्या होत्या.