मुंबईतील रुग्णालये, शाळांना दररोज मिळणार मोफत जेवण, अक्षय चैतन्य भायखळ्यात उभारणार अत्याधुनिक किचन

मुंबईतील रुग्णालयांतील रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठीच नव्हे तर स्थलांतरित मजूर, झोपडपट्टय़ांमध्ये राहणारे गोरगरीब आणि शाळांतील मुलांना पोटभर मोफत जेवण मिळावे यासाठी अक्षय चैतन्य या सेवाभावी संस्थेच्या वतीने भायखळा येथे अत्याधुनिक किचन उभारले जाणार आहे. या किचनमधून दररोज सुमारे एक लाख गरजूंना जेवण आणि पौष्टिक आहार पुरवला जाईल. या ऐतिहासिक प्रकल्पाच्या भूमिपूजन तसेच वृक्षारोपण समारंभ भायखळ्याचे आमदार मनोज जामसुतकर आणि माजी नगरसेविका सोनम जामसुतकर यांच्या हस्ते झाला.

अक्षय चैतन्य या सेवाभावी संस्थेच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मुंबई पोर्ट अॅथॉरिटीने भायखळामधील घोडपदेव येथे 30 हजार चौरस फूट भूखंड मंजूर केला आहे. या ठिकाणी देशातील सर्वात मोठे आणि सर्वात अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज असे किचन उभारले जाणार आहे.

भूमिपूजन समारंभाला हरे कृष्ण चळवळीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे अक्षय पात्र यांच्या वतीने अमितासन दास हे उपस्थित होते. मुंबई पोर्ट अॅथॉरिटीचे उपाध्यक्ष आदेश तितरमारे, मुख्य अग्निशमन अधिकारी इंद्रजित चड्डा, जी. ए. शिरसाट, दिलीप शेडकर, टीएलसी लीगलचे मॅनेजिंग पार्टनर विपिन जैन, व्हीव्हीएफ ग्रुपचे सीएमडी रुस्तम गोदरेज जोशी, एमसीजीएमचे माजी महापौर किशोरी पेडणेकर, महानगर गॅस लिमिटेडचे उपव्यवस्थापकीय संचालक संजय शेंडे आणि माझगाव डॉक शिप बिल्डर्सचे अमित नबीरा उपस्थित होते.

असे असेल किचन

मे 2025 मध्ये बांधकाम सुरू करून जानेवारी 2026 पर्यंत हे किचन पूर्णपणे कार्यरत होणार आहे. 50 हजार चौरस फुटाच्या जागेत सर्वसमावेशक सुविधा, 210 किलोवॅट क्षमतेची मजबूत सौरऊर्जा हा उपक्रमात यशस्वीरित्या पार पाडण्यात फायदेशीर ठरतील. शून्य-कचरा धोरणाचा वापर करून खत तयार केले जाणार आहे.