कोस्टल रोडवर अपघातात तरुणीचा मृत्यू

दक्षिण मुंबईतील कोस्टल रोडवर भरधाव वेगातील कारचे नियंत्रण सुटल्याने वाहनाला अपघात झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या अपघातात तरुणीचा मृत्यू झाला आहे. गार्गी चाटे असे मृत तरुणीचे नाव आहे. तर तिचा मित्र संयम हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातप्रकरणी ताडदेव पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. कोस्टलवरची ही पहिली अपघाती मृत्यूची घटना आहे.

दक्षिण मुंबईला जोडणाऱया कोस्टल रोडवरून रोज हजारो वाहने ये-जा करत असतात. मूळची नाशिकची रहिवासी असलेली गार्गी ही शिक्षणासाठी मुंबईत आली होती. ती शिवाजी पार्क परिसरात राहत होती. शनिवारी ती तिचा मित्र संयमसोबत प्रभादेवी येथून गिरगावच्या दिशेने जात होती. त्यांची कार हाजीअली येथून अमर सन्सच्या दक्षिण वाहिनीवरून जात होती. संयमचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला धडकली. अपघातात ते दोघे जखमी झाले. त्यांना ब्रीच पॅण्डी रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचारादरम्यान गार्गीचा मृत्यू झाला.