महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. त्यावरून टीका होत, सोशल मीडियावरून संताप व्यक्त होत आहे, मात्र एवढे होऊनही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. अशातच पुन्हा एकदा सामूहिक अत्याचाराच्या घटनेने मुंबई हादरली आहे. पाण्यातून गुंगीचे औषध टाकून 18 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना वांद्रे येथील निर्मलनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अत्याचार करण्यात आले आहेत. तुला तुझ्या घरी सोडतो असे या तरुणांनी पीडितेला सांगितले. त्यामुळे ती त्यांच्यासोबत जाण्यास तयार झाली. लिफ्ट दिल्यानंतर तरुणांनी तरुणीला पिण्यासाठी पाणी दिले. या पाण्यात तरुणांनी गुंगीचे औषध टाकले होते. त्यामुळे हे पाणी प्यायल्यावर ती जागीच बेशुद्ध झाली. याच गोष्टीचा फायदा घेऊन ते तरुणीला अज्ञातस्थळी घेऊन गेले. यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
काही वेळानंतर पीडित तरुणीला शुद्ध आल्यानंतर आपल्यावर बलात्कार झाल्याचं तिच्या लक्षात आलं. यावेळी तरुणांनी पीडितेला कोणालाही काही न सांगण्याची धमकी दिली आणि तिला घरी सोडून निघून गेले. घरी सोडल्यानंतर तरुणीने तात्काळ पोलीस स्थानकात जाऊन घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी निर्मलनगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली असून यापैकी एका आरोपीला अटक तर दुसरा आरोपी अद्यापही फरार आहे.