कमला-शक्ती मिल परिसरातून बेकायदा सिलिंडर, कोळसा, तेल जप्त; 136 ठिकाणी पालिकेकडून धडक कारवाई

वर्षअखेर आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून मुंबईभरातील तब्बल 2 हजार 703 ठिकाणी हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, पब या ठिकाणी अग्निसुरक्षेची झाडाझडती घेण्यात आली. यामध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित नसल्याने 136 ठिकाणी कारवाई करण्यात आली. यामध्ये कमला मिल, शक्ती मिल परिसरातून बेकायदा सिलिंडर, 200 किलो कोळसा आणि 135 लिटर जप्त करण्यात आले.

 नववर्षनिमित्ताने होणाऱया पाटर्य़ांच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून 22 डिसेंबरपासून विशेष मोहीम राबवून आस्थापने, हॉटेल्स, रेस्टॉरंटची झाडाझडती घेण्यात आली. यामध्ये 30 डिसेंबर रोजी रात्री ‘जी दक्षिण’ विभागाकडून लोअर परळ भागातील कमला मिल व शक्ती मिल परिसरात कारवाई करण्यात आली. दरम्यान, ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ संपुष्टात आली असली तरी अग्निसुरक्षेच्या अनुषंगाने विविध आस्थापनांची नियमितपणे तपासणी सुरूच राहणार आहे. तरीदेखील नवीन वर्षाच्या अनुषंगाने आयोजित केल्या जाणाऱया विविध सोहळय़ांदरम्यान सर्व आस्थापनांच्या संचालकांनी किंवा आयोजकांनी या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, नागरिकांनीही सोहळा साजरा करताना सतर्क राहावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी महानगरपालिका प्रशासनाकडून केले आहे.