कबुतरखान्याचा वाद चिघळला; आंदोलक रस्त्यावर, पोलिसांशी वादावादी

मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याच्या निर्णयावर नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे कबुतरखान्याचा प्रश्न चिघळताना दिसत आहे. दादर येथील कबुतरखान्यावर ताडपत्री टाकून तो बंद करण्यात आला होता. मात्र, बुधवारी सकाळी मोठ्या संख्यने आंदोलन याठिकाणी जमले. त्यांनी कबुतरखान्यावर टाकलेली ताडपत्री फाडली असून पोलिसांशी त्यांची वादावादी झाली आहे. त्यानंतर आंदोलकांनी त्याठिकाणी ठिय्या दिल्याने वातावरण तापले असून वाहतूक कोंडी होत आहे.

कबूतरखाना बंद करू नये, या मागणीसाठी होणारे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी बुधवारी सकाळी मोठ्या संख्येने आंदोलक कबुतरखाना येथे जमले होते. आंदोलकांनी कबूतर खान्यावरील ताडपत्री फाडल्या आहेत. काही महिला या कबूतरखान्यात उतरल्या असून महापालिकेने लावलेली ताडपत्री त्यांनी काढून टाकली आहे. आंदोलक आक्रमक झाल्याने पोलीस आणि आंदोलकांमध्ये वादावादी झाली आहे. पोलीस आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेकडून हा कबूतर खाना बंद करण्यात आला. मात्र, त्यानंतर मनाई असतानाही अनेकजण कबूतरांना धान्य टाकत असल्याचे लक्षात आले. यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त करत कबूतरांना धान्य टाकणाऱ्यांवर सक्त कारवाई करत गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. यानंतर महापालिकेकडून दादरच्या कबूतर खान्यावर ताडपत्री टाकण्यात आली. जेणे करून लोक तिथे धान्य टाकू शकणार नाहीत आणि कबूतर तिथे बसणार नाहीत. मात्र, यानंतर बुधवारी सकाळी आंदोलक मोठ्या संख्येने येथे जमले आणि त्यांनी कबूतर खान्यावरील ताडपत्री फाडली. त्यामुळे पोलिसांसोबत त्यांनी बाचाबाची झाली. तणाव वाढत असल्याने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.