मुंबईतील डेब्रिजचे रायगडमध्ये डम्पिंग; वहाळ ग्रामपंचायत न्यायालयात

mumbai bombay-highcourt

मुंबईतील इमारत बांधकामांचा भराव बेकायदेशीरपणे रायगड जिह्यातील वहाळ गावात टाकला जात आहे. पालिका घनकचरा व्यवस्थापन नियमावली धाब्यावर बसवून बेकायदा डम्पिंग केले जात आहे. त्यामुळे परिसरात प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होऊन गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. संबंधित डम्पिंग तत्काळ थांबवण्यासाठी प्रशासनाला निर्देश द्या, अशी मागणी करीत वहाळ ग्रामपंचायतीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी डिसेंबरमध्ये सुनावणी होणार आहे. मुंबई महापालिकेच्या हद्दीतून अनेक ट्रकमधून मोठय़ा प्रमाणावर डेब्रिज आणले जाते. ते डेब्रिज बेकायदेशीररीत्या वहाळ गावच्या जमिनीवर डम्पिंग केले जात आहे. त्यामुळे डम्पिंगचा प्रश्न कायमचा सोडवण्याबाबत तसेच पालिका घनकचरा व्यवस्थापन नियमावलीचे पालन करण्याचे संबंधितांना निर्देश द्या, अशी मागणी ग्रामपंचायतीने याचिकेतून केली आहे. अॅड. विनोद सांगवीकर यांनी ही याचिका दाखल केली आहे.