
मार्चच्या सुरुवातीपासून मुंबई शहर व उपनगरांत तापमानाने कहर केला आहे. गेल्या आठवडयात 39 अंशांची विक्रमी पातळी गाठणारे मुंबईचे कमाल तापमान रविवारी पुन्हा 36 अंशांवर पोहोचले. तापमानात चार अंशांची मोठी वाढ झाली. त्यामुळे दुपारी मुंबईकरांना कडक उन्हाचे चटके बसले. पुढील दोन दिवस उष्णतेची तीव्रता आणखी वाढेल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.
होळी सणाची सुरुवात होताच मुंबईसह संपूर्ण राज्यभरात उन्हाची दाहकता वाढली आहे. 4 मार्चला सांताक्रूझमध्ये कमाल तापमानाचा पारा थेट 39 अंशांवर गेला. त्यानंतर सलग दुस्रया दिवशी तापमान त्याच विक्रमी पातळीवर राहिले. पुढे दोन दिवस काहीसा दिलासा मिळाला. मात्र रविवारी पुन्हा तापमानात मोठी वाढ झाली आणि हवामान खात्याच्या सांताक्रूझ पेंद्रावर 35.8 अंश तापमानाची नोंद झाली. सकाळच्या किमान तापमानातही जवळपास 3 अंशांची वाढ होऊन 22.2 अंश इतकी नोंद झाली. याचवेळी मुंबईलगतच्या ठाणे, नवी मुंबईतही उष्णता प्रचंड वाढली आहे. रविवारी ठाण्याचा पारा 39.4 अंशांच्या घरात गेला. डहाणूमध्ये 35 अंश तापमान नोंद झाले. राज्याच्या बहुतांश भागांत उन्हाचा रखरखाट वाढला आहे. थंड हवेचे ठिकाण मानल्या जाणाया महाबळेश्वरमध्येही 31 अंश तापमान नोंदवले गेले. पुढील दोन दिवस तीव्र उष्ण तापमान असेल. नंतर काही दिवस तापमान सरासरीवर राहील आणि 14 मार्चनंतर पुन्हा तापमानवाढ सुरु होईल, असे भाकीत कुलाबा वेधशाळेने केले आहे.
किनारपट्टी भागात पूर्वेकडील तीव्र वारे वाहत आहेत. त्यात अॅण्टी-सायक्लॉनचा प्रभाव जाणवत आहे. त्यामुळे मुंबई महानगरासह आसपासच्या भागात उष्णतेची तीव्रता वाढली आहे. दोन दिवस वातावरणात आर्द्रता आणि अधिक उष्णतेची स्थिती असेल. त्यानंतर तापमानात घसरण होईल.
n सुषमा नायर, शास्त्रज्ञ, कुलाबा वेधशाळा
राज्यातील उष्ण ठिकाणे
सोलापूर 40.2 अंश
जालना 39 अंश
ठाणे 39.4 अंश
जळगाव 38.5 अंश
धाराशीव 37.8 अंश
मालेगाव 37.8 अंश
परभणी 38.4 अंश
नाशिक 37.1 अंश

























































