प्रसुतीमुळे हत्येच्या गुन्हय़ातील महिलेला अटकपूर्व जामीन, दुचाकीस्वाराला ठार मारल्याचा आरोप

दुचाकीस्वाराला ठार मारल्याचा आरोप असलेल्या एका महिलेची मुंबई उच्च न्यायालयाने सुटका केली आहे. महिला गर्भवती होती व तिला नुकतेच बाळ झाले असून आरोपी महिलेची तुरुंगातील चौकशीची आवश्यकता नाही, असे निरीक्षण नोंदवत हायकोर्टाने महिलेचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे.

आरोपी महिला अनम अन्सारी आणि तिचा पती अहमद अन्सारी यांनी मार्च महिन्यात सांताक्रुझच्या वाकोला परिसरातील दुचाकीस्वार ओमप्रकाश शर्मा यांच्यावर हल्ला करून त्याची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनम अन्सारी हिने शर्माला चप्पल, हेल्मेट आणि हातांनी मारहाण केली, तर तिच्या पतीने रस्त्यावरील पेव्हर ब्लॉकने त्याला मारले. या मारहाणीत शर्माचा रुग्णालयात काही दिवसांनी मृत्यू झाला. या प्रकरणात अहमद अन्सारी याला अटक करण्यात आली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. तर त्याची पत्नी घटनेच्या वेळी 30 आठवडय़ांची गर्भवती होती त्यामुळे तिला अटक करण्यात आली नाही. अटक टाळण्यासाठी सत्र न्यायालयाने तिने अर्ज केला, मात्र तो अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर तिने उच्च न्यायालयात अॅड. शेखर सिंह यांच्या मार्फत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला या याचिकेवर सुट्टीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी वकील शेखर सिंग यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, महिलेने एका मुलाला जन्म दिला असून तिचे बाळ आता 25 दिवसांचे आहे आणि त्यामुळे तिला दिलासा देणे आवश्यक आहे. सरकारी वकिलांनी मात्र हा युक्तिवाद फेटाळून लावत गुन्हा गंभीर असल्याचे म्हटले तसेच याचिकेला विरोध केला.

गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही

याचिकेवर आदेश देताना न्यायालयाने नमूद केले की, घटनेनंतर महिला फरार झाली नव्हती. तसेच ती आता 25 दिवसांच्या बाळाची आई असून तिची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही हे लक्षात घेता अर्जदाराची कोठडीत चौकशी करण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.