अदानीची मुजोरी…छत्रपती शिवरायांच्या पुतळय़ाला ‘बंदिवास’, मुंबई विमानतळावर महाराजांच्या पुतळ्याला अडगळीत टाकलं

केंद्रातील मोदी आणि राज्यातील मिंधे सरकारचा लाडका कंत्राटदार असणाऱया अदानी समूहाकडून हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे 37 वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला बंदिवासात ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिवप्रेमींना सदर ठिकाणी पूजाअर्चा आणि साफसफाई करण्यासही मनाई करण्यात येत असून महाराजांचा पुतळा अडगळीत टाकण्याचे महापाप मुजोर अदानी समुहाच्या प्रशासनाने केले आहे.

मालवण राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याने सर्वत्र संताप व्याक्त होत आहे. त्यातच मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर टर्मिनल-1 येथील एनबीटी कार्गो विभागामध्ये एअर इंडियामधील स्थानीय लोकाधिकार समितीकडून 1987 मध्ये बसविण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्याचा प्रयत्न पुनर्विकासाच्या नावाखाली अदानी समूहाच्या ताब्यातील ‘एमआयएएल’ अर्थात मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या व्यवस्थापनाकडून सुरू आहे. विमानतळाच्या ठिकाणी बसविण्यात आलेल्या या पुतळ्याची मोठ्याप्रमाणत नासधूस झाली आहे. त्यानंतर या ठिकाणी चारीबाजूंना पत्र्याची शेड उभारून शिवरायांचा पुतळा बंदिवासात ठेवण्यात आला आहे. पुतळ्याच्या ठिकाणी कुणीही जाऊ नयेत यासाठी कडेकोट सुरक्षाही ठेवण्यात आली आहे.

शिवजयंतीवेळीही रोखण्याचा प्रयत्न

शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी करण्यासाठी 28 मार्च रोजी स्थानीय लोकाधिकार समितीचे पदाधिकारी सदर ठिकाणी गेले असता अदानी समुहाच्या पंपनी व्यवस्थापनाकडून रोखण्याचा प्रयत्न झाला. मात्र, व्यवस्थापनाच्या दबावाला बळी न पडता लोकाधिकार समितीने मोठय़ा दणक्यात शिवजयंती साजरी केली.

पुतळ्याच्या पुनर्स्थापनेस टाळाटाळ

टर्मिनल-1 एनबीटी कार्गो विभागामधील पुतळ्याची पुनर्स्थापना करण्याचे आश्वासन अदानी समुहाच्या अखत्यारीतील मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट व्यावस्थापनाने दिले होते. यासंदर्भात सुबोध भास्करन व राज शेठ यांच्याकडे स्थानीय लोकाधिकार समितीकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र, संबंधितांकडून शिवरायांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचे एअर इंडिया स्थानिय लोकाधिकार समितीचे सरटिणीस प्रशांत सावंत यांनी सांगितले.

पुतळा नव्या जागेत हलविण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा विमानतळाच्या ठिकाणी असणारा पुतळा पुनर्विकासाच्या कामामुळे अडगळीत पडला. स्थानीय लोकाधिकार समितीने एअर इंडिया व्यवस्थापनाच्या परवानगीने हा पुतळा डोमेस्टिक एअरपोर्ट विर्लेपाले या ठिकाणी बसवला होता. इंडियन एअरलाईन्स कंपनीचा एनटीबी या ठिकाणी असलेला ग्राऊंड सपोर्ट विभाग सध्या सगार आंतराष्ट्रीय विमानतळ येथे हलविण्यात आला आहे. त्यामुळे शिवरायांचा पुतळा नविन अभियांत्रिकी संकुल (एनईसी) या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत हलविण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, या मागणीकडेही प्रशासनाकडून दुलर्क्ष करण्यात आले आहे.

पाच महिन्यांपूर्वी पुतळा केला होता गायब

– अदानी समूहाच्या कंत्राटदाराने पाच महिन्यांपूर्वी कुठलीही परवानगी न घेता शिवरायांचा पुतळा गायब केला होता.
– यासंदर्भात लोकाधिकार समितीने 3 फेब्रुवारी रोजी विमानतळ पोलीस व एअरपोर्ट व्यवस्थापनाकडे तक्रार केल्यानंतर दुसऱयाच दिवशी सुरक्षा रक्षकांना पुतळा सापडला.
– लोकाधिकार समितीच्या पदाधिकाऱयांनी घटनास्थळी भेट दिली असता पुतळा भग्नावस्थेत आढळला. या प्रकरणी दोषींवर अदानी प्रशासन आणि पोलिसांकडून अद्याप कारवाई झालेली नाही.

स्थानीय लोकाधिकार महासंघाचा आंदोलनाचा इशारा,पोलिसांची नोटीस

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी अदानी समुहाच्या कंपनीकडून पुनर्विकासाच्या नावाखाली सुरू असलेली मुजोरी. या विरोधात स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाकडून वेळोवेळी आवाज उठविला जात आहे. मात्र, स्थानिक पोलीस प्रशासनाकडून लोकाधिकार समितीच्या पदाधिकाऱयांना नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला जात आहे. शिवजयंती साजरी करण्यावरूनही पदाधिकाऱयांना नोटिसा देत पुतळय़ाच्या ठिकाणी जाण्यास अदानी समूहाच्या सांगण्यावरून पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला होता.