
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी अवैध सरोगेसी आणि एग डोनेशनशी संबंधित आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. बँकॉकहून मुंबईत आलेल्या दोन महिला प्रवाशांच्या यांच्या संशयास्पद हालचालींमुळे हा प्रकार उघडकीस आला. 16 जानेवारी 2026 रोजी बँकॉकहून इंडिगोच्या 6E-1052 या विमानाने मुंबईत आलेल्या दोन महिलांची इमिग्रेशन काउंटरवर नियमित चौकशी करण्यात आली. मात्र परदेश प्रवासाच्या उद्देशाबाबत त्या समाधानकारक माहिती देऊ शकल्या नाहीत. संशय बळावल्याने अधिक चौकशीसाठी त्यांना रोखण्यात आले आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
तीन महिलांविरोधात गुन्हा; दोघी अटकेत
या प्रकरणी पोलिसांनी तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यापैकी दोन महिलांना अटक करण्यात आली आहे, तर तिसरी आरोपी फरार आहे. अटक करण्यात आलेल्या महिलांची ओळख सुनीती सुशील बेलीएल (44) आणि सीमा विंझारत (29) अशी असून, संगीता निलेश बागुल हिचा शोध सुरू आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
आयव्हीएफ सेंटरसाठी एजंट म्हणून काम
पोलिस तपासात उघड झाले की, सुनीती बेलीएल ही 2024 पासून एका आयव्हीएफ सेंटरमध्ये एजंट म्हणून काम करत होती. तिने सहकारी संगीता बागुलच्या मदतीने ठाण्यात ‘एलिट केअर’ नावाची एजन्सी सुरू केली होती. ही एजन्सी देश-विदेशातील फर्टिलिटी सेंटर्सना मोठ्या रकमेच्या मोबदल्यात एग डोनर आणि सरोगेट मदर उपलब्ध करून देत होती.
तपासात असेही समोर आले की, अविवाहित महिलांना बनावट कागदपत्रांच्या आधारे विवाहित दाखवून एग डोनेशनसाठी वापरले जात होते. हा प्रकार सरोगेसी कायद्याचा थेट भंग असून, हिंदुस्थानात एग डोनेशनसाठी महिला विवाहित असणे आणि तिला किमान एक अपत्य असणे बंधनकारक आहे.
परदेशातही एग डोनेशन
दुसरी आरोपी सीमा विंझारत हिने पोलिसांना सांगितले की, 2022 मध्ये ती संगीता बागुलच्या संपर्कात आली. त्यानंतर 2023 ते 2025 या कालावधीत तिने हिंदुस्थानसह केनिया, कझाकस्तान आणि थायलंड येथेही एग डोनेशन केले. अलीकडेच तिला बँकॉकला नेण्यात आले होते, जिथे एग डोनेशनसंदर्भातील वैद्यकीय चाचण्या करून मोठी रक्कम देण्यात आली.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सीमानेही बनावट वैवाहिक कागदपत्रांच्या आधारे एग डोनेशन केले, जे कायद्याने गुन्हा आहे. तपासादरम्यान आरोपींचे मोबाईल फोन, पासपोर्ट, बोर्डिंग पास, वैद्यकीय अहवाल आणि इतर डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत.
सध्या पोलिस या आंतरराष्ट्रीय रॅकेटशी संबंधित इतर व्यक्तींची भूमिका तपासत असून, या नेटवर्कच्या देश-विदेशातील मुळांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे.


























































