
‘शिवसेना हा कागदावरचा नव्हे तर जमिनीवरचा पक्ष आहे. कागदावरचा भाजप किंवा इतर कोणीही जमिनीशी जोडलेल्या शिवसेनेला संपवू शकत नाही हेच मुंबईसह महाराष्ट्रातील महापालिकांच्या निकालाने दाखवून दिले आहे,’
अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सत्ताधाऱयांना ठणकावले. ‘आम्ही कमकुवत नाही आणि खचलेलोही नाही. शिवशक्तीचा प्रत्येक लोकप्रतिनिधी कर्तव्यभावनेने काम करेल आणि मुंबईकरांची जमीन मुंबईकरांसाठीच वापरली जाईल असा वचक मुंबई लुटणाऱ्यांवर ठेवेल,’ असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
मुंबईसह 29 पालिकांच्या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम शिवशक्तीच्या मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले तसेच सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. महापालिकांच्या निवडणुका सत्ताधाऱयांनी अत्यंत घाणेरड्या पद्धतीने लढवल्या. धाकदपटशा, पैशाची लालूच, शिवसैनिकांना तडीपारीच्या नोटिसा, अटकेचे प्रयत्न, दंगली भडकवण्याचे प्रयत्न असे सगळे मार्ग वापरले गेले. आमिषं दाखवून, दमदाटी करून उमेदवाऱया मागे घ्यायला लावल्या. या गुंडगिरीला न घाबरता निर्भयपणे लढणारे आमचे उमेदवार व मतदार लोकशाहीचे खरे रक्षक आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
चार वर्षे ते पैसा पेरत होते…
‘शिवसेनेला नामोहरम करण्याचा एकही प्रयत्न सत्ताधाऱयांनी सोडला नाही. पैशाचा वापर फक्त चार दिवसांत झाला नाही, गेली चार वर्षे ते पैसा पेरत होते. विकासनिधीच्या नावाखाली स्वतःच्या आमदारांना, माजी नगरसेवकांना, काही पदाधिकाऱयांना अमाप पैसा वाटला. अगदी निवडणुकीच्या तोंडावर प्रेशर कुकर, मिक्सर, साड्या वाटल्या. हा पैसा येतो कुठून? त्याचा स्रोत काय आणि त्यामागे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सवाले का लागत नाही?
पैशाच्या धबधब्यासमोर निष्ठा जिंकली!
‘भाजप हा पक्ष केवळ कागदावर आहे, जमिनीवर नाही. तो पक्ष जमिनीवर असता तर त्यांना इतर पक्ष फोडावे लागले नसते, पुसली जाणारी शाई वापरावी लागली नसती, यंत्रणेचा दुरुपयोग करावा लागला नसता, नियम बदलावे लागले नसते. आजही आमचे साधे-साधे शिवसैनिक निवडून आले आहेत. पैशाच्या प्रचंड धबधब्यासमोर निष्ठा कसे ताठ मानेने लढू शकते आणि जिंकू शकते हे शिवसैनिकांनी आणि मतदारांनी दाखवून दिले, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘मागील वेळेस आमचे 84 नगरसेवक निवडून आले होते. त्यांनी शहा सेना तयार केली. आमचे 54 गद्दार फोडले तरीही आम्ही 65 निवडून आणले. ही शिवसेनेची ताकद आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
त्यांना लाज वाटली पाहिजे!
‘मुंबईत ज्यांच्या मदतीने भाजपचा महापौर बसत आहे त्यांना लाज वाटली पाहिजे. हेच लोक बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा चालवण्याच्या गोष्टी करतात. बाळासाहेबांचा विचार मुंबईत शिवसेनेचा महापौर बसावा हा होता आणि खरी शिवसेना मी चालवतोय. त्यामुळे आपण कोणते पाप करतो आहे? मराठी माणसाला काय वाटेल, याचा विचार गद्दारांनी करायला हवा,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ईव्हीएमबद्दलचे मत बदललेले नाही!
ईव्हीएमबद्दल अजूनही तक्रार आहे का, या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट उत्तर दिले. ‘ईव्हीएमबद्दलचं मत एका रात्रीत बदलू शकत नाही. आम्ही आढावा घेत आहोत. काही ठिकाणी अनपेक्षित निकाल लागलेले आहेत. मुंबईत एक प्रकारची लाट होती. मतदान एकतर्फी आमच्या बाजूने होईल असे वाटत होते. प्रत्यक्षात वेगळे घडले. शिवाय व्हीव्हीपॅटही हटवले. त्यामुळे आमचे मत अद्याप बदलेले नाही. जिथे संशय आहे तिथे आहेच. जेव्हा आमच्या हाती काही लागेल, तेव्हा आम्ही बोलूच,’ असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
खुर्च्या मतदान कशा करू शकतात?
शिवतीर्थावरील सभेतील गर्दीवरून उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. ‘शिवतीर्थावर झालेल्या शिवशक्तीच्या सभेच्या वेळी शिवाजी पार्क गर्दीने फुलून गेले होते. त्याच्या दुसऱया दिवशी झालेल्या महायुतीच्या सभेत फक्त रिकाम्या खुर्च्यांची गर्दी होती, याकडे लक्ष वेधून उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आमच्याकडे गर्दी जमते, पण मतदान होत नाही. त्यांच्याकडे रिकाम्या खुर्च्याही मतदान करतात हे पहिल्यांदाच कळलं. हे एक न उलगडलेलं कोडं आहे.’
खुपसे म्हणजे ‘खुपसे’
एकनाथ शिंदे यांचे घर असलेल्या वॉर्डातच शिवसेनेच्या उमेदवाराने बाजी मारली आहे. त्याविषयी विचारले असता उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना विजयी उमेदवाराचे नाव विचारले. पत्रकारांनी ‘खुपसे’ असे म्हणताच, यातून खुपसे काही समजण्यासारखं आहे’, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला.
निवडणूक आयुक्त संविधानापेक्षा मोठे नाहीत!
बोटावरची शाई पुसली जातेय हे समोर आणणाऱयांवर कारवाई करण्याचा इशारा राज्य निवडणूक आयुक्तांनी दिला होता. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. ‘आयुक्त म्हणजे कोणी ब्रह्मदेवाचा बाप नाही. त्यांनी लोकांच्या भावनेशी खेळ करू नये, लोकशाहीचा अपमान करू नये. अन्यथा त्यांनाही शिक्षा करावी लागेल. निवडणूक आयुक्त संविधानापेक्षा मोठे नाहीत. तेही एक मतदार आहेत हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे. अशा निवडणूक आयुक्तांवर जनताच अॅक्शन घेईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिंदे गट फोडून भाजप महापौर बनवेल!
शिंदे गटाने भाजपकडे केलेल्या अडीच वर्षांच्या महापौर पदाच्या मागणीची उद्धव ठाकरे यांनी खिल्ली उडवली. ‘शिवसेना फोडून जसा शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवला तसा भाजप शिंदेंचा गट फोडून त्यांचा महापौर बनवेल,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. जानेवारीमध्ये शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हावर कोर्टात सुनावणी आहे. त्याची पुढची तारीख कोणत्या महिन्यात आणि कोणत्या वर्षीची मिळतेय बघू. पण तिथला निकाल संविधानानुसार आला आणि शिंदे गटाचं नाव, चिन्ह गेलं की त्यांचा उपयोग काय राहिला, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
मराठी माणसाचा आशीर्वादाचा हात कायम
‘मराठी माणसाचा शिवसेनेवरील आशीर्वादाचा हात कायम आहे. मराठी पट्टय़ातील शिवसेनेचे गड अभेद्य आहेत. अमराठी आणि विविध धर्मांतील लोकही आमच्यासोबत राहिले. उत्तर भारतीयांनीही आम्हाला मते दिली. आता शिवसेनेचे लोकप्रतिनिधी सभागृहात जातील तेव्हा मुंबई महापालिकेची तिजोरी सत्ताधाऱयांनी कशी लुटलीय, कसे गैरव्यवहार केलेत याचा भंडाफोड होईल’, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
त्यांच्या खेळाला उत्तर देऊन जे यश ‘शिवशक्ती’नं मिळवलंय त्यामुळं सत्ताधाऱयांना घाम फुटलाय. आम्ही हरलेलो नाही. तोडीस तोड उत्तर दिलंय. आमच्या पराभवातही तेज आहे, त्यांचा विजय डागाळलेला आहे.
देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल!
विजयी उमेदवारांसह ‘मातोश्री’ निवासस्थानी आलेल्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. ‘‘आपली जबाबदारी आता वाढलेली आहे. शिवसेनेचा महापौर व्हावा अशी इच्छा आहे. आज तेवढा आकडा आपल्याकडे नाही, पण देवाच्या मनात असेल तर तेही होईल,’’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरून महायुतीच्या गोटात टेन्शन वाढले आहे. शिवसेनेची रणनीती नेमकी काय आहे, यावर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
































































