दुय्यम दर्जाच्या कॉलेजसाठीही यंदा काटे की टक्कर

अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या रांगेतील एकूण 2 लाख 38 हजार 934 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 47 टक्के विद्यार्थी हे 79.99 ते 60 टक्क्यांमधील आहेत. या विद्यार्थ्यांची संख्या 1 लाख 12 हजार 873 एवढी असून यंदा दुय्यम दर्जाच्या कॉलेजमधील जागा पटकाविण्यासाठीदेखील काटे की टक्कर होणार आहे. 100 ते 80 टक्के गुण मिळविणाऱया विद्यार्थ्यांची संख्या 65 हजार 76 एवढी आहे. या विद्यार्थ्यांचा कल मुंबईतील काही नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याकडे असेल. मात्र डिस्टिंक्शन आणि फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दुय्यम दर्जाच्या कॉलेजवरच समाधान मानावे लागणार आहे.

अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी एकूण 2 लाख 47 हजार 664 जागा उपलब्ध आहेत. यासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीवर नजर टाकल्यास 80 ते 100 टक्क्यांमधील विद्यार्थ्यांमध्ये 63 विद्यार्थ्यांना 100 ते 99 टक्के गुण आहेत. तर 95 ते 98.99 टक्क्यांमधील 3715 तसेच 90 ते 94.99 टक्क्यांमधील 14,034 विद्यार्थी आहेत. तर 80 ते 89.99 दरम्यान गुण असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 47,264 एवढी असून 59.99 आणि त्याखालील 60,985 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

शाखानिहाय आलेले अर्ज, उपलब्ध जागा

शाखा               आलेले अर्ज      उपलब्ध जागा

कॉमर्स             1,23,774        2,08,520

सायन्स              93,895         1,33,440

आर्ट्स                20,429            52,310

एचएसवीसी             836               4965

आर्ट्सच्या 32,310 जागा रिक्त, एचसीव्हीसीच्या 4965 जागांसाठी 836 अर्जच

अकरावी प्रवेशात यंदा आर्ट्स शाखेकडील विद्यार्थ्यांचा कल यंदा ओसरला आहे. मुंबई एमएमआर विभागात केवळ 20 हजार विद्यार्थ्यांनीच आर्ट्स शाखेसाठी अर्ज केले आहेत. आर्ट्स शाखेतील एकूण उपलब्ध जागा 52 हजार 310 असून यंदा अर्ज कमी आल्याने तब्बल 32 हजार 310 जागा रिक्त राहणार आहेत. हीच परिस्थिती एचसीव्हीसी शाखेची होणार असून या शाखेच्या एकूण 4965 जागांसाठी केवळ 836 विद्यार्थ्यांनीच अर्ज केले आहेत. कॉमर्स आणि सायन्स शाखेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत उपलब्ध जागांची संख्या अधिक असल्याने या शाखांतील जागादेखील मोठय़ा प्रमाणावर रिक्त राहणार आहेत.