मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर,उपमहापौरपदी सुहास वाडकर

210

मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर तर उपमहापौरपदी शिवसेनेचेच ऍड. सुहास वाडकर यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्ज सादर करण्याच्या आज शेवटच्या दिवशी दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने 22 नोव्हेंबर रोजी ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.

राज्यातील 27 महानगरपालिकांमधील महापौरपदाची पहिल्या अडीच कर्षांची मुदत 21 नोक्हेंबरला संपत आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयातून गेल्या आठवडय़ात महापौरपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये मुंबईसाठी सलग दुसऱ्या वेळी खुल्या प्रवर्गाचे  आरक्षण पडल्याने सर्व 222 नगरसेवकांना महापौरपदाची संधी निर्माण झाली होती. त्यामुळे अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी कोणत्या पक्षाकडून किती अर्ज येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तरीदेखील 94 नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेचा महापौर होणार हे आधीच स्पष्ट झाले होते. या पार्श्वभूमीवर आज महापौरपदासाठी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर आणि उपमहापौरपदासाठी ऍड. सुहास वाडकर यांनी पालिका चिटणीस प्रकाश जेकटे यांच्याकडे अर्ज सादर केला. यावेळी महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, आमदार ऍड. अनिल परब, आमदार रमेश कोरगावकर, शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक, विधी समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे, आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले, ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल पाटणकर, आशीष चेंबूरकर, अनिल कोकीळ, समाधान सरवणकर, स्नेहल आंबेकर, तृष्णा विश्वासराव, सचिन पडवळ, राजूल पटेल, सुवर्णा करंजे, अनंत (बाळा) नर, रमाकांत रहाटे आदी नगरसेवक उपस्थित होते.

खड्डेमुक्त-कचरामुक्त मुंबई हे पहिले उद्दिष्ट! – किशोरी पेडणेकर

महापौरपदी  विराजमान होताच खड्डेमुक्त-कचरामुक्त स्वच्छ-सुंदर मुंबई बनवण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवार किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी दिलेली जबाबदारी निष्ठsने पार पाडणार असून त्यांचा विश्वास सार्थ ठरवेन असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊनच आपण शिवसैनिक म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठेने काम करीत असल्याचे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. सुरुवातीच्या काळात नर्सिंगची सेवा सांभाळतानाच निष्ठावंत, कट्टर आणि धडाडीच्या शिवसैनिक म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला. त्यानंतर महिला उपविभाग संघटक, विभाग संघटक, सिंधुदुर्ग जिल्हा महिला संपर्क संघटक अशा पदांवर काम केले असून सध्या त्या रायगड जिल्हा व शिर्डी महिला संपर्क संघटक अशा जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. 2002 मध्ये त्या पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या. त्यानंतर 2012 मध्ये प्रभाग समिती अध्यक्षा, महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष, शहर स्थापत्य समिती अध्यक्षा, सुधार-स्थायी समिती सदस्य म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा असताना पेडणेकर यांनी महिलांच्या सक्षमीकरणाकरिता जेंडर बजेट मंजूर करून घेतले. युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वैविध्यपूर्ण दृष्टिकोनातून साकारलेल्या विविध योजना आणि कामांमुळे महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या सर्वेक्षणामध्ये त्या प्रथम क्रमांकाच्या नगरसेविका ठरल्या आहेत.

विश्वास सार्थ ठरवणार!- ऍड. सुहास वाडकर

शिवसेना  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपमहापौरपदाची दिलेली जबाबदारी पार पाडताना सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी काम करून त्यांचा विश्वास सार्थ ठरवून दाखवेन असा ठाम विश्वास उपमहापौरपदाचे उमेदवार ऍड. सुहास वाडकर यांनी व्यक्त केला.

पालिकेच्या 2017 निवडणुकीत कुरार व्हिलेज येथून पहिल्यांदाच निवडून आलेले उपविभागप्रमुख ऍड. सुहास वाडकर हे गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम करीत आहेत. त्यांनी विधी समिती अध्यक्ष म्हणूनही यशस्वीरीत्या काम केले आहे. त्यांचे वडील चंद्रकांत वाडकर हे तब्बल 17 वर्षे शिवसेनेचे नगरसेवक राहिले असून त्यांनी स्थायी समिती अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे आपल्या वडिलांचा समाजकारणाचा वारसा शिवसेनेच्या माध्यमातून सुरू ठेवणार असल्याचे सुहास वाडकर यांनी सांगितले.

भाजप, विरोधकांची माघार

2017 च्या निवडणुकीनंतर महापौरपदासह कोणत्याही समितीच्या अध्यक्षपदावर दावा न करणाऱ्या भाजपने या वेळीही संख्याबळ नसल्यामुळे महापौरपदासाठी उमेदवार दिला नसल्याचे सांगितले. शिवाय विरोधी पक्षनेते काँग्रेसचे रवी राजा, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनीदेखील आपल्याकडे पुरेसे संख्याबळ नसल्यामुळेच महापौरपदासाठी अर्ज दाखल केला नसल्याचे पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या