मुंबईला दररोज होणाऱ्या पाणीपुरवठय़ात वाढ होऊनही अनेक वॉर्डमध्ये गढूळ आणि दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत शिवसेना नेते–युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आवाज उठवल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली आहे. गळती आणि पाण्याचा प्रेशर वाढल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचा प्राथमिक अंदाज काढण्यात आला असून गळती रोखण्यासाठी कॅमेऱ्याने तपासणी करून लिकेज रोखण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.
मुंबईला पाणी पुरवठा होणाऱ्या सातही तलावक्षेत्रात 90 टक्क्यांवर पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे 5 जूनपासून सुरू झालेली पाणीकपात ऑगस्टपासून रद्द करण्यात आली आहे. असे असताना मुंबईतील सातहून अधिक वॉर्डमध्ये पाणीबाणी निर्माण झाली आहे. याबाबत नागरिकांकडून अनेक तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी नुकतीच केली होती. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाची जल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. यामध्ये पाण्याची गळती आणि वॉर्ड स्तरावर पाणी पुरवठा होणाऱ्या जलसाठय़ामध्ये हाय पॉवरच्या पंपांमधून पाणी उचलले जात असल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. नागरिकांनी पाणीपुरवठाविषयक तक्रारींसाठी 1916 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केले आहे.
या भागात पाणी समस्या
एफ दक्षिण विभागातील टी. जे. मार्ग, गाडी अड्डा, क्रिसेंट बे, जेरबाई वाडिया रस्ता, गं. द. आंबेकर मार्ग, भोईवाडा स्मशानभूमी, एफ उत्तर विभागातील जोगळेकर वाडी, जी दक्षिण विभागातील सेंच्युरी मिल म्हाडा कंपाऊंड, सीताराम जाधव मार्ग, ना. म. जोशी मार्ग, डिलाईल रोड याचबरोबर वांद्रे (पूर्व) येथील खारदांडा, आप्पा पाडा, क्रांतिनगर, मालाड दिंडोशी, बोरिवली येथील राजेंद्र नगर आदी क्षेत्रात पाण्याबाबत तक्रारी आहेत.
जलवाहिन्यांवरील गळती तातडीने शोधून ती दूर करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करावा, विविध पाळय़ांमध्ये कर्मचारी नियुक्त करावेत, पाणी गळती सापडल्यानंतर ती विनाविलंब दूर करावी, असे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले.
बेकायदेशीर मोटार पंप, अनधिकृत नळजोडण्या यांना आळा बसावा म्हणून पथके गठीत करणे, असे अनधिकृत प्रकार आढळल्यास मोटारपंप जप्त करावेत, तसेच दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देशही आयुक्तांनी दिले.