मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना या वर्षी 30 हजार रुपये बोनस मिळणार आहे. याबाबत कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांच्याकडे केलेल्या मागणीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधीच हा बोनसची घोषणा होण्याची शक्यता आहे.
पालिका कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी 26 हजार रुपये बोनस देण्यात आला होता. तर या वर्षी 30 हजार रुपये बोनस द्यावा, अशी मागणी कामगार संघटकांच्या समन्वय समितीकडून करण्यात आली. याला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी दिली. यावेळी टीबी कर्मचाऱयांनाही बोनस द्यावा अशी मागणीही केल्याचे बाबा कदम म्हणाले. याबाबत येत्या तीन ते चार दिवसांत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी समन्वय समितीचे सत्यवान जावकर, अशोक जाधव, वामन कविस्कर, के. पी. नाईक, अॅड. प्रकाश देवदास, दिवाकर दळवी आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, बेस्ट कर्मचाऱयांना 40 हजार बोनस द्यावा, अशी मागणी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी महाव्यवस्थापकांकडे पत्राद्वारे केली आहे.