
जागतिक वारसा स्थळ असलेल्या एलिफंटा बेटावरील उत्खननात मोठा पुरातन ‘खजिना’ हाती लागला आहे. या उत्खननात दीड हजार वर्षांहून अधिक जुने आणि दगड-विटांनी बांधलेले पुरातन जलाशय, इंडो मेडिटेरेनियन पद्धतीचे अॅम्पह्रा जारचे तुकडे, आयातीत सिरॅमिक्स आणि काचेच्या वस्तू सापडल्या आहेत. सहा तांब्याची आणि पाच शिशाची अशी 11 दुर्मिळ नाणीही सापडली आहेत.
मुंबईच्या समुद्रात असलेल्या निसर्गसंपन्न एलिफंटा बेटावरील प्राचीन मानवी वसाहतीचे स्वरूप आणि व्याप्ती जाणून घेण्यासाठी उत्खनन पुरातत्त्व विभागाने सुरू केले आहे. भारतीय पुरातत्त्व सर्व्हेक्षण विभागाची एक टीम पुरातत्त्व शास्त्र्ाज्ञ अधीक्षक डॉ. अभिजित आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली चार महिन्यांपासून उत्खनन करीत आहे. 60 ते 70 कामगार मोरा बंदर परिसरात उत्खनन करीत आहेत.
n उत्खननात सापडलेल्या आयताकृती जलाशयाच्या उत्तरेकडे पायऱ्यांचा एक लंबवत भाग जोडलेला आहे. या रचनेमुळे बेटावरील प्राचीन जलव्यवस्थापन पद्धतीवर प्रकाश पडणार आहे. बेटावरील रहिवाशांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे आणि पावसाळ्यात पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात यावे या उद्देशाने विशेष अभियांत्रिकी कौशल्याचा वापर करून हा जलाशय तयार करण्यात आला आहे. या जलाशयाची लांबी 14.7 मीटर असून रुंदी 6.7 मीटर आणि 10.8 मीटर इतकी आहे. यात 20 पायऱ्या असून त्या दगडांच्या ठोकळ्यांपासून बांधण्यात आल्या आहेत. हे दगड एलिफंटा बेटावरील स्थानिक दगड नाहीत अशी माहिती डॉ. अभिजित आंबेकर यांनी दिली.
आणखी काय सापडले…
अलीकडच्या उत्खननात इंडो मेडिटेरेनियन (रोमन) अॅम्पह्राचे तुकडे, आयातीत सिरॅमिक्स आणि काचेच्या वस्तू सापडल्या आहेत. टर्क्वाईज ग्लेस्ड वेअरचे काही तुकडे आणि मेसोपोटेमियातील टॉर्पेडो व भूमध्य सागरी प्रदेशातील अॅम्पह्रा जार यांचे मिळून तीन हजाराहून अधिक खापराचे तुकडे सापडले आहेत. टॉर्पेडो जार आणि अॅम्पह्रा ही प्राचीन काळातील महत्त्वाची सागरी जहाजे होती. उत्खननात सापडलेली दोन तांब्याची नाणी ही कलचुरी घराण्यातील कृष्ण राजांची असल्याची माहिती पुणे येथील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर संशोधन संस्थेचे प्रा. अभिजित दांडेकर यांनी दिली.





















































