
लाचलुचपत विभागाने सहाय्य पोलीस निरीक्षकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पडकले. तुषार काळे असे लाच घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून तो खार पोलीस ठाण्यात कार्यरत होता. या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. काळे याला एसीबीने अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.
एका प्रॉपर्टीच्या प्रकरणात तक्रारदाराच्या बाजूने चौकशी अहवाल देण्यासाठी तुषार काळेने तीन लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी दीड लाख रुपयांचा पहिला हफ्ता घेताना काळे याला एसीबीने रंगेहाथ पकडले. तक्रारदार यांचे वांद्रे न्यायालयात एक प्रॉपर्टीचे प्रकरण सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तुषार काळेची नेमणूक करण्यात आली होती. हा अहवाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी काळेने तीन लाख रुपयांची लाच मागितली होती.
तक्रारदाराने एसीबीला याबाबत माहिती दिली. यानंतर एसीबीने सापळा रचून काळेने लाचेचा पहिला हफ्ता स्वीकारताना रंगेहाथ पकडले आणि अटक केली.


























































