Mumbai news – 12 वर्षीय मुलीच्या पोटातून काढला केसांचा गोळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सारखे पोटात दुखणे, भूक न लागणे, जेवल्यानंतर उलटय़ा होणे अशा विविध कारणांमुळे त्रस्त असलेल्या 12 वर्षीय चिमुकलीच्या पालकांनी तिला डॉक्टरांकडे नेले. वैद्यकीय तपासणीनंतर तिच्या पोटात गाठ असल्याचे निदान झाले. त्यानुसार डॉक्टरांनी ‘अप्पर गॅस्ट्रोइंटेस्टाइन एंडोस्कोपी’ केली आणि त्यांना धक्काच बसला. चिमुकलीच्या पोटात भला मोठा केसाचा गोळा असल्याचे डॉक्टरांना आढळले. या गोळ्याने पोटाची 90 टक्के जागा व्यापल्याचे उघड होताच डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून मुलीच्या पोटातून 16 बाय 14 सेंटीमीटर आकाराचा केसांचा गोळा बाहेर काढला.

12 वर्षीय चिमुकलीचे वजन अचानक वाढून 39 किलोपर्यंत पोहोचले. मात्र तिच्या शरीराचा विकास वयाच्या मानाने अत्यंत धिम्या गतीने होत होता. तसेच तिला भूक न लागणे, उलटय़ा होणे पोटात दुखणे असे त्रास सुरूच होते. याबाबत चिंता व्यक्त करत चिमुकलीच्या पालकांनी तिला नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलमधील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि हेपॅटोलॉजी विभागातील बालरोगतज्ञ डॉ. आदित्य कुलकर्णी यांच्याकडे तपासणीसाठी नेले. या आजाराचे निदान करण्यासाठी डॉ. कुलकर्णी यांनी ‘अप्पर गॅस्ट्रोइंटेस्टाइन एंडोस्कोपी’ केली असता त्यांना पोटात केसांचा एक मोठा गोळा दिसून आला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बालरोग शस्त्रक्रिया विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉ. रसिकलाल शहा यांनी ओपन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.