
रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार हजेरी लावलेल्या पावसामुळे सोमवारी मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले. शहर आणि उपनगरांतील अनेक भागांत मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले. सायन, माटुंगा, दादर, चेंबूर, कुर्ला, वडाळा, दादर, परळ, अंधेरी, जोगेश्वरी, घाटकोपर आदी भागांतील रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांवरही वाहतूक मंदावली होती. तसेच मध्य रेल्वेवर कुर्ला, सायन, माटुंगा या स्थानकांत रुळांवर पाणी साचल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली. रस्ते आणि रेल्वे मार्गांवर पावसाचा परिणाम झाल्याने नोकरदारांची चौफेर कोंडी झाली.
सोमवारी दुपारपर्यंत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू राहिल्याने मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले. जवळपास सहा ते सात तास मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे सखल भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. त्यात अनेक गाडय़ा अडकल्या. रस्त्यालगतच्या हाऊसिंग सोसायटय़ांच्या संकुलातही पाणी शिरले होते. नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा साचल्याने अनेक भागांत रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते. किंग्ज सर्कल परिसरात रस्ता जणू तलाव बनला होता. जवळपास दोन फुटांपर्यंत पाणी साचल्याने त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. दक्षिण आणि मध्य मुंबईप्रमाणेच उपनगरांनाही पावसाचा फटका बसला.
पालिका कर्मचाऱयांची जीव धोक्यात घालून डय़ुटी
दादर-हिंदमाता, किंग्ज सर्कल, माटुंगा, फाईव्ह गार्डन आणि हिंदू कॉलनी परिसरात काही तास पाण्याचा निचरा झाला नाही. महापालिकेने पंप लावून पाण्याचा उपसा केला. पालिका कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील मॅनहोल उघडून पाण्याचा निचरा करण्यास सुरुवात केली. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून डय़ुटी बजावली. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले. उघडय़ा मॅनहोलच्या आजूबाजूने जाणाऱया मुंबईकरांना सावध करण्यासाठी पालिका कर्मचाऱयांनी मॅनहोलच्या झाकणावरच बसून पहारा दिला.
महामार्गांवर वाहनांच्या रांगा
पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांवर सकाळी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. पश्चिम द्रुतगती महामार्गावर विलेपार्ले विमानतळ परिसरासह अंधेरी, जोगेश्वरी, कांदिवली भागात मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. दोन्ही दिशेकडील मार्गिकांवर वाहनांची रखडपट्टी झाली. त्यात अनेक रुग्णवाहिका अडकून पडल्या. आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने नोकरदार, व्यापाऱयांचे प्रचंड हाल झाले.
बेस्ट गाड्यांचे मार्ग वळवले
बेस्टच्या अनेक गाडय़ांचे मार्ग वळवण्यात आल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. खार स्वामी विवेकानंद मार्गावर नॅशनल कॉलेज येथे पावसाचे पाणी भरल्याने वांद्रे तलाव आणि खार पोलीस स्टेशनदरम्यान बसमार्ग ए 1, 4 मर्यादित सी 33, 83, ए 84, ए 202, 255 मर्यादित, ए 473 या बसेस लिंकिंग मार्गाने वळवण्यात आल्या. यासह अंधेरी, दिंडोशी, कांदिवली, घाटकोपर परिसरातही पाणी साचलेल्या भागातील अनेक बसेस पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या.