Mumbai News – बीएसई, उच्च न्यायालय, मेट्रो आणि बँकांमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानभवनानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई उच्च न्यायालय, मेट्रो सेवा आणि बँकांसह प्रमुख आस्थापनांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी ई-मेलद्वारे ही बॉम्बस्फोट आणि क्षेपणास्त्र हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचा मेल प्राप्त झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून खबरदारीच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. पोलीस पथकांनी सदर ठिकाणी शोध मोहिम सुरू केली असून बॉम्ब शोध आणि निकामी पथक (बीडीडीएस) देखील तैनात करण्यात आले आहे.

शोध मोहिमे दरम्यान आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलीस अधिकारी सध्या धमकीच्या ईमेलची सत्यता पडताळत असून प्रकरणाची सविस्तर चौकशी करत आहेत. पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये आवश्यक कायदेशीर कारवाई सुरू केली जात आहे, असे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी सांगितले.