
विक्रोळीच्या पार्क साईट येथे लावण्यात आलेल्या एका पोस्टरवरून वाद झाला होता. या वादातून अज्ञात इसमांनी तक्रारदाराच्या घराबाहेर लावलेला पडदा जाळल्याची घटना आज पहाटे घडली. या प्रकरणी पार्क साईट पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पार्क साईटच्या संभाजी चौकात लावण्यात आलेल्या पोस्टरवरून सोमवारी वाद निर्माण झाला होता. या प्रकरणातील तक्रारदाराने पोस्टर्स लावण्यास विरोध केला होता. त्यामुळे त्याची चार ते पाच जणांसोबत शाब्दिक चकमक झाली होती. हा प्रकार लक्षात येताच बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली होती. या घटनेनंतर आज पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराच्या घराच्या बाहेरील दरवाजाजवळ लावलेला पडदा अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध पार्क साईट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.