
नव्या वर्षात 100वे अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलन होणार आहे. त्याआधी ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतील आगळेवेगळे मिनी नाटय़ संमेलन मुंबईत रंगणार आहे. या मिनी नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष अभिनेता, लेखक विराजस कुलकर्णी तर स्वागताध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव आहेत. हे संमेलन येत्या 6 जानेवारीला दादर येथील श्री शिवाजी मंदिर येथे सायंकाळी 7 वाजता पार पडेल.
मिनी नाटय़ संमेलनात अभिनेता भरत जाधव यांचा विशेष सन्मान होईल. भरत जाधव यांनी ‘सही रे सही’चे पाच हजार प्रयोग पूर्ण केले आहेत आणि अजूनही ते या नाटकात भूमिका करत आहेत. यानिमित्ताने त्यांना गौरवण्यात येणार आहे. तसेच एका नाटय़ निर्मात्यालाही या सोहळ्यात सन्मानित केले जाईल.
याच वेळी एक सांस्कृतिक जल्लोषदेखील सादर होणार असून नृत्य, नाटय़, चित्रपटगीते, भावगीते, कथ्थक, लावणी याचा आनंद रसिकांना घेता येईल. या वेळी लेखक, दिग्दर्शक संतोष पवार एका अवलिया रंगकर्मीविषयीचे प्रहसन सादर करणार आहेत. कार्यक्रमात संतोष पवार, स्मृती तळपदे, सना शर्मा, नीलिमा गोखले, जयंत पिंगुळकर, श्रीरंग भावे, शिल्पा मालंडकर, संपदा माने, मेघा घाडगे या मान्यवरांचा सहभाग असणार आहे. संगीत संयोजन प्रशांत लळीत यांचे असून नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे असणार आहे. कुणाल रेगे निवेदन करणार असून प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची आहे.
हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांकरिता विनामूल्य आयोजित केला असून विनामूल्य प्रवेशिका 3 जानेवारीपासून श्री शिवाजी मंदिर येथे सकाळी 8.30 ते 11 आणि सायंकाळी 5 ते 8 या वेळेत नाटय़गृहावर उपलब्ध होतील, असे अशोक मुळ्ये यांनी सांगितले.



























































