
ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांवर संघर्ष करण्याची वेळ येऊ देऊ नका, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. तसेच त्यांनी शिक्षणाच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. गेल्या चार दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षकांचे आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे.
यावेळी आंदोलनस्थळी भेट देत शरद पवार म्हणाल आहेत की, “ज्ञानदानाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे आणि उद्याची महाराष्ट्राची पिढी ही तयार करायची नैतिक जबाबदारी ज्यांनी अंत:करणापासून स्वीकारलेली आहे त्यांना संघर्ष करण्याची वेळ येऊन देऊ नका. लवकरात लवकर जी 24 ऑक्टोबरची जी काही तुम्ही ऑर्डर काढली ती पोकळ ऑर्डर ठेवू नका. त्यासाठी काही हजार बाराशे कोटी लागतील. मला आकडा नक्की माहिती नाही. त्याची तरतूद करा आणि पैसे द्यायला सुरुवात करा.
शरद पवार म्हणाले की, “या राज्यामध्ये शिक्षकांचा सन्मानच होतो या प्रकारचा इतिहास घडवा. हा आग्रह आम्ही लोक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू. मला असं वाटतं की, हा तुम्हा सगळ्यांचा आग्रह योग्य आग्रह असल्यामुळे त्यांना याबद्दलचा निर्णय घ्यावा लागेल आणि त्यासंबंधीची आग्रही भूमिका मी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांकडून घेतली जाईल.”

























































