गुन्हेगारांचा कर्दनकाळ… एसीपी दया नायक सेवानिवृत्त

गँगस्टर्स, दहशतवादी, ड्रग्ज माफियांचा कर्दनकाळ, ‘चकमक फेम’ अशी देशभरात ख्याती असलेले धडाकेबाज पोलीस अधिकारी दया बंडा नायक हे आज सेवानिवृत्त झाले.

1995 च्या तुकडीचे उपनिरीक्षक असलेले दया नायक यांनी पोलीस दलासाठी भरीव कामगिरी बजावली. मुंबईत उफाळलेल्या गँगवार व अंडरवर्ल्डचा बंदोबस्त करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. समाजकंटक व ड्रग्जमाफियांचे त्यांनी कंबरडे मोडले. मुंबई गुन्हे शाखेबरोबरच दहशतवादविरोधी पथकात काम करताना नायक यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. अनेक क्लिष्ट गुह्यांची देशभरातील आपल्या तगडय़ा नेटवर्कच्या आधारे उकल करण्याची कामगिरी नायक यांनी ताकदीने पार पाडली. नुकतीच दया नायक यांची सहाय्यक आयुक्तपदी बढती झाली होती. अखेर प्रदीर्घ देशसेवेनंतर नियत वयोमानानुसार दया नायक हे आज सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले.