
मुंबईतील मानखुर्द परिसरात फालुदा विक्रेत्याची चाकूने वार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हल्ल्यात जखमी विक्रेत्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. वाहिद उर्फ सोनू मसिबुल्ला शेख असे मयत विक्रेत्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
मुंबईतील मानखुर्दच्या मंडाळा परिसरात मंगळवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अल मदिना हॉटेलबाहेर शेखवर हल्ला करण्यात आला. शेखच्या ओळखीच्या व्यक्तीनेच हा हल्ला केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या शेखला स्थानिकांनी तात्काळ शताब्दी रुग्णालयात नेले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.




























































