
मुंबई विमानतळावर गांजा आणि सोने तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. सीमाशुल्क विभागाने गांजा आणि सोने तस्करीप्रकरणी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून 5.2 किलो गांजा आणि 1.51 किलो सोने हस्तगत करण्यात आलं आहे. सीमाशुल्क विभागाने दोन विविध प्रकरणांत ही कारवाई केली.
मुंबई कस्टम झोन-III च्या विमानतळ आयुक्तालयाने 3 आणि 4 ऑगस्ट 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय (CSMI) विमानतळावर कारवाई केली. या कारवाईत 6.41 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने आणि अंमली पदार्थ जप्त केले. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
पहिल्या कारवाईत 3 ऑगस्ट रोजी, विमानतळावरील एका ट्रान्झिट प्रवाशाने 4.51 किलो सोन्याची पावडर मेणबत्तीच्या चार तुकड्यांमध्ये लपवली होती. हे तुकडे विमानतळावरील कर्मचाऱ्याकडे सोपवण्यात आले होते. एअर इंटेलिजेंस युनिट (एआययू) च्या अधिकाऱ्यांनी त्या कर्मचाऱ्याला अडवून झडती घेतली असता सोने आढळून आले. सदर कर्मचाऱ्याला कस्टम कायदा, 1962 अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
दुसरी कारवाई 4 ऑगस्ट रोजी करण्यात आली. बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाची तपासणी करताना त्याच्या ट्रॉली बॅगमध्ये व्हॅक्यूम-सीलबंद पॅकेटमध्ये लपवून ठेवलेला 5.027 किलोग्रॅम गांजा आढळला. अधिकाऱ्यांनी हा गांजा जप्त केला आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची किंमत सुमारे 5 कोटी रुपये आहे. आरोपीला नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे.