Mumbai News – घटस्फोट मागितल्याने मुलासमोरच पत्नीला लोकलसमोर ढकलले, आरोपी पतीला सूरतमधून अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कौटुंबिक वादातून पतीने 13 वर्षाच्या मुलासमोरच पत्नीला थेट लोकलसमोर ढकलल्याची धक्कादायक घटना मुलुंड रेल्वे स्थानकावर घडली. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पती मुलाला घेऊन पळून गेला. लोहमार्ग पोलिसांनी कसून शोध घेत आरोपीला गुजरातमधून बेड्या ठोकल्या आहेत. राजू गुप्ता असे आरोपीचे तर पुष्पा असे मयत पत्नीचे नाव आहे.

राजू आणि पुष्पा यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. अखेर सततच्या त्रासाला कंटाळून पुष्पा मोठ्या मुलाला घेऊन उत्तर प्रदेशातील गावी निघून गेली. मात्र, भावाने समजूत काढत पुष्पाला पुन्हा 14 मार्च रोजी मुंबईत पतीकडे आणले आणि दोघांमधील वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केली.

शनिवारी पुष्पा भावासोबत बाहेर जाण्यासाठी मुलुंड स्थानकावर आली होती. मात्र, राजूने युक्तीने मेहुणा कमलेश आणि आपल्या मोठ्या मुलाला घरात कोंडून ठेवले. तसेच मेहुण्याचे एटीएम कार्ड व ओळखपत्र पळवले. त्यानंतर राजूने लहान मुलाला घेऊन थेट मुलुंड स्थानक गाठले. तेथे दोघांमध्ये पुन्हा कडाक्याचे भांडण झाले. पुष्पाने घटस्फोट घेण्याची इच्छा व्यक्त करताच राजूला राग अनावर झाला आणि त्याने समोरून येणाऱ्या कल्याण लोकलसमोर पुष्पाला ढकलून दिले. या भीषण अपघातात पुष्पाचा जागीच मृत्यू झाला.

पुष्पाचा मृत्यू झाल्यानंतर राजू 13 वर्षांच्या मुलाला घेऊन पसार झाला. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा माग काढत त्याला सुरत येथून अटक केली. राजूच्या मुलाने पोलिसांसमोर वडिलांच्या गुन्ह्याची माहिती दिली. लोहमार्ग पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.