
गुंतवणुकीच्या नावाखाली कांदे व्यावसायिकाचे दहा लाख रुपये पळून घेऊन गेलेल्या एकाला जोगेश्वरी पोलिसांनी सहा महिन्यांनी अटक केली. जावेद तसरीफ खान असे त्याचे नाव आहे.
तक्रारदार यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. गेल्या वर्षी एक जण तक्रारदार यांच्या दुकानात आला. कांद्याचा भाव कमी झाला आहे. मार्केटमधून कांदा घेऊन त्याची साठवण करून, पुढे भाव वाढला तर फायदा होईल असे त्यांना सांगण्यात आले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन त्यांनी गुंतवणूक करण्याचे ठरवले. त्यानंतर त्यांनी पैशांची जुळवाजुळव केली. त्यानंतर एकाने त्यांना फोन करून भेटण्याबाबत चर्चा केली.
चर्चेनंतर त्याने तक्रारदार यांना भाईंदर येथे भेटण्यास बोलावले. तेव्हा त्यांच्याजवळ 10 लाख रुपये होते. त्या दोघांनी रिक्षा पकडून ते काशिमीरा येथे आले. तेथे रिक्षाचे मीटर खराब झाल्याने दुसरी रिक्षा पकडून ते जोगेश्वरी जेव्हीएलआर जंक्शन येथे आले. त्यानंतर एकाने त्यांना पैशांची बॅग पाठीवर सुरक्षित नसल्याचे सांगितले. तक्रारदार यांनी पाठीवरची बॅग काढून पुढे घेतली. काही क्षणांत त्याने ती बॅग स्वतःकडे घेतली. तेवढ्यात एक रिक्षा तेथे आली. त्या दोघांनी एकाला रिक्षात बसवले. काही कळण्याच्या आत रिक्षा जोरात नेली. फसवणूक झाल्याचे लक्षात त्यांनी जोगेश्वरी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
























































