
तिन्ही रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. देखभाल दुरुस्तीचे कामाकरीता मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकमुळे तिन्ही मार्गावरील लोकल सेवेवर परिणाम होणार आहे. लोकल गाड्यांच्या नियमित वेळांमध्ये बदल केले जाणार आहेत. ट्रान्स हार्बर आणि उरण मार्गावरील रेल्वे सेवा या काळात कोणत्याही व्यत्ययाशिवाय नियमित वेळापत्रकानुसार धावतील.
मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा आणि मुलुंड दरम्यान जलद मार्गावरील सेवा सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 पर्यंत बंद राहतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा येथे धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंड येथे पुन्हा जलद मार्गावर वळवण्यात येतील.
अप आणि डाउन दोन्ही मार्गांवर गाड्या 15 मिनिटे उशिराने धावतील. ठाण्याहून सकाळी 11.03 ते दुपारी 3.38 दरम्यान अप आणि जलद मार्गावरील गाड्या देखील माटुंगापर्यंत धीम्या मार्गावर वळवल्या जातील.
हार्बर रेल्वेवर कुर्ला आणि वाशी रेल्वे स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत पूर्ण मेगाब्लॉक असेल. सीएसएमटीहून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 पर्यंत वाशी, बेलापूर आणि पनवेलला जाणाऱ्या सर्व डाउन गाड्या तसेच सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 पर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मर्यादित विशेष उपनगरीय गाड्या केवळ सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी मार्गावर धावतील, मात्र काही गाड्या रद्द करण्यात येतील. हार्बर लाईनवरील प्रवाशांना सकाळी 10 ते संध्याकाळी 6 दरम्यान ठाणे-वाशी/नेरुळ सेवा वापरण्याची परवानगी असेल.
पश्चिम रेल्वेवर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 पर्यंत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही जलद मार्गांवर जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या स्थानकांदरम्यान रेल्वे सेवा विस्कळीत राहतील. या दरम्यान सर्व जलद गाड्या धीम्या मार्गावर धावतील. परिणामी, लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही लोकल वांद्रे किंवा दादर स्थानकापर्यंत चालवण्यात येतील.