
मुंबई महानगरपालिकेने पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन, शुद्ध सांडपाण्याची व्यवस्था केली परंतु याला मिळालेल्या अल्प प्रतिसादाने आता महापालिकेच्या तोंडचे पाणी पळाले आहे. महानगरपालिकेकडून तयार होणाऱ्या शुद्ध सांडपाण्याला खरेदीदार मिळत नसल्याने, दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी, महानगरपालिकेने आता दरकपातीचा प्रस्ताव पुढे आणला आहे. कुलाबा येथील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पातून दररोज सुमारे 10 दशलक्ष लिटर शुद्ध पाणी तयार होते. मात्र त्यातील मोठा हिस्सा वापराशिवाय राहतो. परिणामी, दररोज सुमारे 3 ते 4 दशलक्ष लिटर पाणी थेट समुद्रात सोडावे लागत आहे.
मागणी वाढवण्यासाठी महापालिकेने आता एक शक्कल लढवली आहे. शुद्ध पाण्याचा दर एकसमान ₹15 प्रति किलोलीटर ठेवण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्याची तयारी केली आहे. यापूर्वी विविध वापरकर्त्यांसाठी वेगवेगळे दर आकारले जात होते, जे ₹21 प्रति हजार लिटरपर्यंत जात होते. विशेष म्हणजे, हे पाणी तयार करण्यासाठीच महापालिकेला सुमारे ₹12 प्रति किलोलीटर खर्च येतो. तज्ज्ञांच्या मते, या प्रकल्पाला मर्यादित प्रतिसाद मिळण्यामागे दोन प्रमुख कारणे आहेत—मुंबईत पिण्याच्या पाण्याचे तुलनेने कमी दर आणि कुलाबा येथून शहराच्या इतर भागात शुद्ध पाणी पोहोचवण्यासाठी होणारा जास्त वाहतूक खर्च होतो.
2020 मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प सुएझ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड करुन चालवला जात आहे. या प्रकल्पाची एकूण क्षमता ही 37 MLD असली तरी, त्यातील केवळ 10 MLD पाणी उच्चस्तरीय शुद्धीकरणानंतर वापरासाठी उपलब्ध होते. पूर्वी हे पाणी क्रिकेट क्लब आॅफ इंडिया, इंडियन नेव्ही आणि लार्सन अॅण्ड टुर्बो यांसारख्या संस्थांनी या पाण्याचा वापर केला होता. मात्र, मागणी सातत्याने टिकली नाही. दरम्यान, एसआर इंटरप्रायजेस या महिला गटाने कमी दरात ₹10 प्रति हजार लिटर 3 MLD पाणी खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. हे पाणी ऑरेंज गेट बोगदा प्रकल्पासह विविध बांधकाम कामांसाठी वापरण्यात येणार आहे.
























































