
दुर्मिळ वन्य जीवांची तस्करी करताना एका प्रवाशाला शुक्रवारी मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली आहे. हा आरोपी बंगळुरूहून मुंबईत आला होता. सीएसएमआयएने आरोपीकडील दुर्मिळ ससा, पोपट आणि कासवांची सुटका केली. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपीला अटक केली आहे. सुहेल अहमद असे अटक आरोपीचे नाव आहे.
सीमाशुल्क विभागाच्या माहितीनुसार, सुहेल हा बंगळुरूचा रहिवासी असून गुप्त माहितीच्या आधारे त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या सामानाची झडती घेतली असता त्यामध्ये दोन सुमंत्रण स्ट्रीप्ड ससे, एक मृत ग्रेट बिल्ड पोपट आणि एक इंडोचायनीज बॉक्स टर्टल आढळून आले. या प्राण्यांचे फोटो काढून वेस्टर्न रिजनच्या वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोच्या प्रादेशिक उपसंचालकांना पाठवण्यात आले. पोलिसांना दिलेल्या जबाबात आरोपीने आपला गुन्हा कबूल केला.
अज्ञात व्यक्तीच्या सूचनेवरून तो हे प्राणी मुंबई विमानतळाबाहेर एका अज्ञात व्यक्तीकडे सोपवणार होता. आर्थिक फायद्यासाठी आपण हे कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचेही कबूल केले.