नियमबाह्य भाडे आकारणाऱ्या रिक्षा-टॅक्सीचालकांविरुद्ध तक्रारींसाठी व्हॉट्सऍप नंबर, शिवसेनेच्या दणक्यानंतर कार्यवाही

प्रवाशांकडून नियमबाह्य भाडे आकारणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मनमानीविरोधात शिवसेनेने आवाज उठवताच परिवहन विभागाने कठोर पावले उचलली आहेत. नियमबाह्य भाडे आकारणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरुद्ध तक्रारींसाठी लवकरच व्हॉट्सअॅप नंबर कार्यान्वित केला जाणार आहे. संपूर्ण मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील नागरिक एकाच व्हॉट्सअॅप नंबरवर तक्रार करू शकणार आहेत. त्यामुळे रिक्षा, टॅक्सीचालकांच्या मनमानीला चाप बसणार आहे.

रिक्षा-टॅक्सी चालकांकडून करण्यात येणाऱ्या नियमबाह्य भाडे आकारणीच्या मुद्यावर वांद्रे पूर्वेकडील शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांनी गुरुवारी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली. वांद्रे, खार, अंधेरी रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांना रिक्षा व टॅक्सी चालकांची अरेरावी सहन करावी लागते. चालक नियमबाह्य पद्धतीने भाडे आकारतात. अनेक प्रवाशांना इच्छित स्थळी सोडण्यास नकार देतात. यासंदर्भात परिवहन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार वरुण सरदेसाई यांनी केली. याची दखल घेत परिवहन विभागाने हॉट्सअॅप नंबर लवकरात कार्यान्वित करण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले.

आरटीओ आणि पोलिसांची गस्त घालणार

व्हॉट्सअॅप नंबर सुरू ठेवण्याबरोबर मोटार परिवहन विभाग (आरटीओ) आणि वाहतूक पोलिसांचे संयुक्त पथक नेमण्यात येणार आहे. हे पथक ज्या भागांत नागरिकांना रिक्षा व टॅक्सीचालकांकडून अधिक त्रास होतो, त्या भागांत वारंवार गस्त घालणार आहे.

इथे करा तक्रार

सध्या अंधेरी प्रादेशिक विभागातील तक्रारींसाठी 9920240202 हा व्हॉट्सअॅप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. या क्रमांकावर प्रवाशांना रिक्षा, टॅक्सी तक्रारी करणे शक्य होणार आहे.