
नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून एका तरुणाने मैत्रिणीला रस्त्यात गाठून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना कांदिवली परिसरात घडली. याप्रकरणी कांदिवली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दीपक आर्या असे आरोपीचे नाव असून त्याच्या बॅगेत बंदुक आणि तीन जिवंत गोळ्या सापडल्या.
आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दीपक आर्या मूळचा उत्तराखंडचा रहिवासी असून पीडिता आणि तो एका एकत्र नोकरी करत होते. नोकरीच्या ठिकाणी दोघांची मैत्री झाली. सहा महिन्यांनी दीपकने नोकरी सोडली आणि गावी परत गेला. मात्र दोघांचे फोनवरून बोलणे सुरूच होते.
काही दिवसांनी दीपकने पीडितेला मानसिक त्रास देण्यास सुरवात केली. यामुळे पीडितेने त्याचा नंबर ब्लॉक केला. यामुळे संतापलेल्या दीपकने तिच्या ऑफिसमध्ये घुसून तिला शिवीगाळ केली. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर तेथून पळून गेला.
घाबरलेल्या पीडितेने तात्काळ कांदिवली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पीडितेचा जबाब नोंदवला. घटनास्थळी पडलेली आरोपीची बॅग ताब्यात घेऊन तपासली असता आत बंदूक आणि तीन गोळ्या सापडल्या. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे.