
पाताळगंगेतील जांभिवली येथे सरकारकडून जबरदस्तीने लादल्या जाणाऱ्या जैववैद्यकीय कचरा प्रकल्पाविरोधात संतप्त ग्रामस्थांनी वज्रमूठ आवळली आहे. मुंबईतील जैविक कचऱ्याचा प्रकल्प खालापूरकरांच्या माथी का मारला जात आहे, असा सवाल उपस्थित करत संतप्त गावकऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर धडक दिली. या प्रकल्पामुळे भविष्यात कॅन्सर, टीबी, न्युमोरिया, अस्थमा तसेच त्वचा रोगासारख्या आजारांचा धोका उद्भवण्याची भीती असल्याने हा प्रकल्प होऊ देणार नाही असा इशारा दिला.
जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया हा प्रकल्प हद्दपार करण्यासाठी ग्रामस्थांनी पंचायतीमध्ये ठराव मंजूर केला आहे. मुंबईचा कचरा खालापूरकरांच्या माथी जबरदस्ती मारत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथील अध्यक्ष सिद्धेश कदम व सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेतली. यावेळी मुंबई वेस्ट मॅनेजमेंटचे अतिरिक्त पाताळगंगा येथील प्रकल्प ग्रामस्थांचा तीव्र विरोध असल्याबाबत निवेदन दिले. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुख्यालयाचे कार्यकारी अधिकारी वेल रासू, उपकार्यकारी अधिकारी धनंजय सावळकर व महाव्यवस्थापक विकास सूर्यवंशी यांनादेखील निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात सुनील सोनावळे, मारुती पाटील, दशरथ गायकर, रमेश कोंडीलकर, महादेव गडगे आदी उपस्थित होते.
लढा सुरू ठेवण्याचा निर्धार
जैववैद्यकीय प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी गावागावात बॅनरबाजी केली असून प्रकल्प हद्दपार करण्यासाठी सुरू केल्या आहेत. हा प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.