मुंबई पोलीस एससी फायनलमध्ये

सलामीवीर तन्मय मयेकर (नाबाद 94 धावा) आणि यश रामछाबदानी (नाबाद 51 धावा) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर ग्रेटर मुंबई पोलीस एससी (ब) संघाने उपांत्य फेरीत अजंता फार्मा एससीवर 10 विकेट राखून दणदणीत विजय मिळवताना एमसीए कॉर्पोरेट ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पोलीस जिमखान्यावर झालेल्या सामन्यात शुक्रवारी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत अजंता फार्माने आक्रमक सुरुवात केली. त्यात सलामीवीर रोहन गुढेकर (58 धावा), सलील किणी (34 धावा) आणि समर्थ कोकाटे (30 धावा) या आघाडीच्या तीन फलंदाजांनी चांगले योगदान दिले, पण उर्वरित फलंदाजांनी अक्षरशः विकेट फेकून दिल्याने त्यांना 20 षटकांत 8 बाद 143 धावा करता आल्या. प्रत्युत्तरादाखल बृहन्मुंबई पोलिसांच्या मयेकर आणि रामचंदानी या सलामीच्या जोडीने अजंता फार्माच्या सर्वच गोलंदाजांवर वर्चस्व गाजवताना 16.3 षटकांत बिनबाद 145 धावा करताना संघाला 10 विकेट राखून जिंकून दिले. मयेकरच्या 94 धावांच्या नाबाद खेळीत 11 चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे.