
हेरॉईन ड्रग्जची खरेदी- विक्री करणारी ड्रग्ज तस्करांची टोळी पायधुनी पोलिसांनी उद्ध्वस्त केली. सहा पुरुष व तिघा महिला ड्रग्ज तस्करांना पकडून पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 36 कोटी 55 लाख 25 हजार रुपये किमतीचे हेरॉईन, आठ लाख 26 हजार रुपयांची रोकड आणि 10 लाख किमतीचे गुन्ह्यात वापरलेले वाहन असा 36 कोटी 72 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
16 डिसेंबर रोजी पायधुनी पोलिसांनी पीडिमेलो मार्गावर जलाराम ठक्कर आणि वसीम सय्यद अशा दोघांना 326.22 ग्रॅम हेरॉईनसह रंगेहाथ पकडले होते. त्यांच्या चौकशीत रुबीना खान हिचे नाव पुढे आले. तिच्या चौकशीत शबनम शेख हिचे नाव समोर आल्यानंतर तिला अजमेर येथे पकडण्यात आले. या प्रकरणात मुस्कान शेख, अब्दुल शेख, नवाजीस खान, सारीक सलमानी, समद खान अशा नऊ जणांचे रॅकेट जेरबंद करण्यात आले. या सर्वांकडून पोलिसांनी 33 कोटी 86 लाख 76 हजार रुपयांचा हेरॉईन ड्रग्जचा साठा हस्तगत केला. अशा प्रकारे ड्रग्ज तस्करांचे मोठे रॅकेट जेरबंद करून कोटय़वधी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात पायधुनी पोलिसांना यश आले.





























































