
पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक, लुटमार करण्याच्या घटना वाढल्यामुळे अशा तोतया पोलिसांना पायबंद घालण्यासाठी मुंबई पोलिसांना डिजिटल स्मार्ट ओळखपत्रे दिली जाणार आहेत. त्यासाठी 4 कोटी रुपये खर्चास आज शासनाने मान्यता दिली. मुंबई पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना छापील ओळखपत्रे देण्यात येतात. छापील ओळखपत्राची डीटीपीच्या मदतीने प्रत बनवता येते. त्याची डुप्लिकेट सहज बनवली जाऊ शकते.
ऑनलाइन माध्यमांद्वारे बनावट ओळखपत्रांचा वापर करून डिजिटल अटकेसारख्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. अशा घटनांना ही स्मार्ट कार्ड आळा घालू शकतील. मुंबई पोलिस दल ओळखपत्रावर असा कोड जारी करणारे पहिले दल ठरेल. जर कोणताही अधिकारी-कर्मचारी ओळखपत्राचा गैरवापर करताना आढळला तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असाही इशारा शासनाने दिला आहे. सदर तंत्रज्ञान-सक्षम ओळखपत्रे बनवताना गोपनीयता अनिवार्य असल्याने मुंबई पोलिस आयुक्तांच्या स्तरावर बंद निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी अशाही सूचना देण्यात आल्या.