मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा; सुट्ट्यांमुळे बोरघाटात वाहतुकीचा खोळंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रामनवमीच्या सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसत आहे. यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या 5 किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्या आहेत. सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मुंबईहून पुणे आणि सातारा-कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अचानक वाढल्याने ही कोंडी निर्माण झाली आहे. उन्हाळ्याची सुट्टी आणि धार्मिक सणांच्या निमित्ताने बाहेर पडलेल्या प्रवाशांना घाटातील संथ वाहतुकीमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न
वाहतुकीची ही भीषण कोंडी सोडवण्यासाठी महामार्ग पोलिसांनी आता विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत. बोरघाटातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी ’10-10 मिनिटांचा ब्लॉक’ घेण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये काही वेळ वाहने थांबवून टप्प्याटप्प्याने पुढे सोडली जात आहेत, जेणेकरून घाटात एकाच वेळी सर्व वाहने अडकून पडणार नाहीत. पोलीस कर्मचारी घटनास्थळी तैनात असून दुपारपर्यंत ही परिस्थिती निवळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रवाशांनी शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.