
कर्णधार सिद्धेश लाडच्या संयमी आणि आक्रमक शतकाच्या जोरावर तसेच सुवेद पारकर आणि मुशीर खानच्या मोलाच्या योगदानामुळे मुंबईने रणजी ट्रॉफी एलीट गट ‘ड’ सामन्यात दिल्लीविरुद्ध पहिल्या डावात आपली बाजू भक्कम केली आहे. शुक्रवारच्या खेळाअखेर मुंबईने पाच विकेट गमावून 266 धावा केल्या असून दिल्लीवर 45 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. गुरुवारी 1 बाद 13 धावांपासून पुढे खेळ सुरू करताना मुंबईची सुरुवात डळमळीत झाली. सकाळच्या सत्रात तुषार देशपांडे (1) आणि अखिल हेरवाडकर (12) माघारी परतल्याने संघ अडचणीत सापडला. मात्र अशा संकटक्षणी मुशीर खान आणि कर्णधार सिद्धेश लाड यांनी संयम दाखवत डाव सावरला. चौथ्या विकेटसाठी या जोडीने 63 धावांची उपयुक्त भागीदारी रचली. 42 व्या षटकात राहुल चौधरीने मुशीर खानला बाद करत ही भागीदारी तोडली. मुशीरने 114 चेंडूंमध्ये सात चौकारांसह 57 धावांची झुंजार खेळी केली.































































